ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरामध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. जवानांनी या परिसराला वेढा घातला असून चकमकी संदर्भात कोणत्याही अफवा पसरू नयेत म्हणून, परिसरातील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा जवानांनी या परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, लष्कराच्या 50 आरआर, एसओजी आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली.
त्यानंतर दहशतवाद्यांना आपल्याला वेढा घातला आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यावेळी त्यांना जवानांकडून शरण येण्याचा मार्ग सुचवला तरीही दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. त्यांना प्रत्युत्तर देत जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले.