प्रत्येक वार्डात औषध फवारणीसाठी पक्के नियोजन
विशाल कदम / सातारा
शहरात कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रत्यक्ष नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे हे दररोज न चुकता पालिकेत येऊन आढावा घेऊन सूचना देत आहेत. त्यांच्या सूचनेनुसार तब्बल तीन महिन्यांपासून धूर फवारणी सुरू आहे. ती आणखी तीव्र करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक घरी जाऊन सॅनिटायझर फवारणी करण्यासाठी विशेष टीम तैनात करण्यात आली असून त्या टीमकडून कामकाज सूरु झाले आहे.
सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम या सर्वसामान्य महिला म्हणून निवडून दिल्याने त्यांनी कुठेही सातारकर जनतेच्या सेवेला कमी भासू न देण्याचा पणच गेल्या सव्वा चार वर्षात केला आहे. राजमाता श्री. छ. कल्पनाराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्या गेल्या सव्वा चार वर्ष चांगल्या काम करत आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात त्या प्रत्येक वॉर्डात जाऊन नागरिकांना काय हवे नको याची स्वतः विचारपूस करत होत्या. त्या अनुषंगाने सॅनिटायझर फवारणी केली जात होती. धूर फवारणी करण्यात येत होती. यावर्षी दुसरी लाट सुरू होण्यापूर्वी त्यांनी पालिकेत आढावा बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. त्यानंतर प्रथम नागरिक या नात्याने सातारा शहरावर आलेले संकट टळावे यासाठी स्वतः नगराध्यक्षा माधवी कदम यांनी दररोज पालिकेत न चुकता हजेरी लावत आहेत. आरोग्य विभागाच्या निरीक्षक यांच्याकडून व कोरोना विभाग प्रमुख यांच्याकडून त्या आढावा घेऊन सूचना देत आहेत. कुठल्याही वॉर्डात काही कमी पडू नये यासाठी त्या कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी होऊ नये, लस घ्यावी असे आवाहन केले होते.
उपाध्यक्ष मनोज शेंडे हे कार्यतत्पर
उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी तर शहर संकटातून बाहेर काढण्यासाठी दररोज पालिकेत येऊन कामकाज पहात आहेत. जेथे कमी पडत असेल तेथे हे जाऊन कारभार सुरळीत पार पाडत आहेत. प्रत्येक घरोघरी जाऊन सॅनिटायझर फवारणी करण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या असून त्या अनुषंगाने 40 वॉर्डात 40 पथके तयार केलेली असून त्या पथकात स्वतः वॉर्डाचे मुकादम आणि दोन कर्मचारी हे काम पहात आहेत. सर्व यंत्रणा त्या पथकाना दिली गेली आहे. त्यामुळे उपाध्यक्ष मनोज शेंडे हे कार्यतत्पर आहेत याचाच प्रत्यय येतो.
मुख्याधिकारी यांचे केबिनचे दार सदैव उघडे
कोरोनाच्या काळात सातारा पालिकेत एक दृष्टीस पडते ते म्हणजे सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या केबिनकडे पाहिल्यावर प्रत्यय येतो तो म्हणजे यांचे केबिन सतत उघडे असते. केबिनमध्ये न चुकता मुख्याधिकारी अभिजित बापट हे हजर असतात. शहरातील कोणत्याही नागरिकांना भेटण्याचे टाळत नाहीत. अगदी चार दिवसांपूर्वी ते बॅरिकेट लावण्यासाठी शहराची पाहणी केली तर सोनगाव कचरा डेपोला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री दहा वाजल्यापर्यत स्वतः हजर होते.