शिये / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील निगवे दुमाला-केर्ले रस्त्यावर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे ऊस वाहतूक करणारा ट्रक पल्टी झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
एम एच ०९ बी ए ४९४४ हा ट्रक दत्त दालमिया साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करत होता.निगवे दुमाला कडुन केर्ले कडे जाताना वळणावर असलेल्या खड्ड्यामुळे तो पल्टी झाला.ट्रकचे नुकसान झाले असुन ऊस रस्त्याच्या बाजुला विखुरला आहे.
साखर कारखाने सुरू होऊन आठ-दहा दिवस झाले आहेत. अद्याप तीन ते साडेतीन महिन्यांचा गळीत हंगाम शिल्लक आहे.अशा रस्त्याने ऊस वाहतूक कशी करायची असा प्रश्न ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना पडला आहे. तसेच जोतिबा-पन्हाळ्याकडे जाणारे पर्यटक याच मार्गाने जातात.त्यामुळे वाहनधारक व प्रवाश्यांची गैरसोय टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे लक्ष देऊन तात्काळ खड्डे मुजवावेत अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी व वाहनधारकांतून होत आहे.