प्रतिनिधी / सातारा
केंद्रीय निवडणूक आयोगाने पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषदेचा कार्यक्रम जाहीर केला असून या कार्यक्रमानुसार जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी केल्या.
पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात बैठक प्र. जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गीता शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुकीला जे नियम असतात तेच नियम या निवडणुकीसाठीही आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी विकास कामांबाबत बैठकीचे आयोजन करु नये तसेच नवीन कामांचे उद्घाटन करु नये. तसेच सार्वजनिक ठिकाणी संबंधित पक्षाचे चित्रे, चिन्हांचे फलके तात्काळ काढून घ्यावीत, अशा सूचनाही प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी या बैठकीत केल्या.