गोवा कॅन-सरकारी यंत्रणांच्या संयुक्त बैठकीत चर्चा : कोडार-खांडेपार नदीतील वाढत्या दुर्घटना हा गंभीर प्रश्न : 19 रोजी घटनास्थळांची होणार पाहणी
प्रतिनिधी /फोंडा
कोडार-खांडेपार नदीत बुडून मृत्यू होण्याच्या घटना हा गंभीर सामाजिक विषय असून मानवी जीवत सुरक्षा हक्काचा प्रश्न निर्माण करणारा आहे. गेल्या दहा वर्षांत 15 हून अधिक लोक या नदीत बुडाले आहेत. त्यामध्ये बहुतेक विद्यार्थी व तरुण आहेत. अशा घटना रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांनी तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता गोवा कॅन या बिगर सरकारी संस्थेने केली आहे. फोंडा तालुक्याचे उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांच्या उपस्थितीत विविध सरकारी खात्यांच्या अधिकाऱयांच्या संयुक्त बैठकीत या विषयावर चर्चा झाली.
25 जुलै यंदापासून ‘वर्ल्ड ड्रावनिंग प्रिव्हेंन्शन डे’
सोमवारी सकाळी उपजिल्हा कार्यालयात झालेल्या या बैठकीत अशा घटना रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखता येईल, याचा आढावा घेण्यात आला. येत्या 19 जुलै रोजी कोडार-खांडेपार नदीतील धोकादायक स्थळांची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. गोवा कॅनचे रोनाल्ड मार्टिन्स व लॉर्ना फर्नांडिस यांनी बैठकीसमोर हा विषय सविस्तर मांडला. प्रत्येक व्यक्तीला ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत हक्क दिलेले आहेत. मात्र या हक्कांबरोबरच जबाबदारीची तेवढीच जाणिव हवी. नदीत बुडून मृत्यू होण्याच्या वाढत्या घटनांची जागतिक आरोग्य संघटना व संयुक्त राष्ट्र संघाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या विषयावर व्यापक जागृती व उपययोजना आखल्या जाव्यात यासाठी या वर्षापासून 25 जुलै हा ‘वर्ल्ड ड्रावनिंग प्रिव्हेन्शन डे’ म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे, अशी माहिती मार्टिन्स यांनी दिली.
शाळा महाविद्यालयांनीही जागृती करावी
कोडार नदीच्या पात्रात आजवर बुडून मृत्यू आलेल्यामध्ये बहुतेक विद्यार्थी व तरुण आहेत. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनीही हा विषय गांभीर्याने घेऊन जागृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विविध खात्यांचे सरकारी अधिकारी व ग्रामपंचायती सारख्या स्थानिक स्वराज्यसंस्थांनी मानवी हक्काविषयी नवीन कायदे व कायदा दुरुस्तीविषयी सजग असणे आवश्यक आहे.
दारु पिऊन पाण्यास उतरण्यास बंदी घाला
नदीत बुडालेले बहुतेक लोक पिकनीक किंवा मौजमजेसाठी आले होते. त्यामुळे अशा जागा पिकनिकसाठी किती सुरक्षीत आहेत, याचा विचार व्हायला हवा. तेथे दारू नेण्यास बंदी घालावी लागेल. त्यासाठी ‘दारू पिऊन पाण्यात उतरू नये’ असे सूचना फलक ठळकपणे उभाराण्याची सूचना त्यांनी केली. आजवर फोंडा तालुक्य़ातील कोडार खांडेपार व धारबांदोडा तालुक्यातील दूधसागर नदीत जेवढय़ा घटना घडलेल्या आहेत त्यांची यादी तयार करून संबंधित दुर्घटना स्थळे अधोरेखीत केली जावीत. लोकांना तेथे जाण्यास बंदी घालणाऱया उपाययोजना आखल्या जाव्यात, यासंबंधी अधिकाऱयांशी सल्लामसलत करण्यात आली.
धोकादायक चिरेखाणींचा मुद्दाही चर्चेत
नदी पात्रांबरोबरच फोंडा व धारबांदोडा तालुक्यातील धोकादायक चिरेखाणींचाही विषय चर्चेत आला. चिरे काढून मोकळय़ा सोडलेल्या खाण पिठांमध्ये पावसाळय़ात पाणी भरुन राहते. तुये-पेडणे येथे अशाच एका चिरेखाणीत कोवळय़ा वयातील तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने हा विषय चर्चेत आला होता. मोकळय़ा खाण पिठांना सभोवताली कुंपण उभारणे तसेच धोक्य़ाच्या सूचना देणारे फलक उभारण्यासाठी सक्ती करण्याची सूचनाही करण्यात आली. पेडणे तालुक्यातील अशा काही मोकळय़ा खाणपिठांच्या सभोवताली सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून कुंपण घातल्याचे खाण खात्याच्या अधिकाऱयांनी सांगितले.
पाण्यात उतरुन सेल्फी घेण्याचे प्रकार जीवावर बेतले
कोडार खांडेपार नदीचे पात्र पोहोण्यासाठी सुरक्षित नसल्याचे काही अधिकाऱयांनी यावेळी नजरेस आणून दिले. पाण्यात उतरून मोबाईलवर फोटो किंवा सेल्फी घेताना एक दोन विद्यार्थी बुडाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. सुरक्षेसंबंधी काही सूचनाही मांडल्या. बैठकीला खाण खात्याचे उपसंचालक अभिर हेदे, पोलीस निरीक्षक मोहन गावडे, अग्नीशामक दलाचे स्टेशन अधिकारी सुशिल मोरजकर, अबकारी खात्याचे निरीक्षक शशिकांत नाईक, बांधकाम खात्याच्या विभाग 16चे जमाल आगा, एस. व्हाय. गावडे, जलस्रोत खात्याचे श्री. अन्वर कासमल, पशुसंवर्धन खात्याचे उपसंचालक डॉ. एम. जी. उमर्ये, फोंडा विभागीय कृषी अधिकारी प्रज्ञा गावडे प्रियोळकर, गटविकास अधिकारी अश्विन देसाई व इतर अधिकारी उपस्थित होते.