वार्ताहर / परळी
परळी खोऱ्यातील राजापुरी, ता. सातारा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास दुचाकी व पिकअपची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दुचाकीवरुन प्रवास करणारे दोन शिक्षक जखमी झाले आहेत. अपघातस्थळी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी जावून जखमींना सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, परळी खोऱ्यात बहुतांशी रस्ते हे घाट रस्ते आहेत. त्यामुळे अनेकवेळा अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. दि. 18 रोजी दुपारी 3 च्या सुमारास राजापुरी, ता. सातारा येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले प्रमोद विठ्ठल मुळे (वय 65) व दिगट तात्याबा माने (वय 54) हे राजापुरीकडून साताऱ्याकडे निघाले होते.
बोरणे घाट येथे सवरीचा वाकना या नावाच्या शिवारात कारी गावच्या हद्दीतून घाट रस्त्याने जात असताना समोरुन सज्जनगडकडून येणाऱ्या पिकअप गाडीची व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मुळे व माने धडक बसल्याने दुचाकीसह रस्त्यावर खाली पडले. या घटनेत दोन्ही शिक्षक गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी दोन्ही शिक्षक रस्त्यावर पडले होते. यावेळी येणाऱ्या, जाणाऱ्या वाहनातील नागरिकांची गर्दी तिथे जमली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ तेथील नागरिकांनी सातारा तालुका पोलीस स्टेशन तसेच दवाखाने यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी अपघातस्थळी पोहोचल्यावर जखमींना सायंकाळी सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली नव्हती.