प्रतिनिधी / सांगली
महापूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी आमदार रोहित पवार यांच्याद्वारे कर्जत जामखेड मतदारसंघातील नागरिक आणि बारामती ऍग्रो कंपनीच्या माध्यमातून मदत करण्याच्या उद्देशाने १ लाख ९० हजारांहून अधिक जीवनावश्यक साहित्याची व्यवस्था केली आहे. सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी त्याचे वाटप सुरू केले आहे.
पुराच्या पाण्यामुळे संसार उध्वस्त झालेल्या सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी सोलापुरी चादर १५०० नग, बिस्कीट पुडे १३०००, पाण्याच्या बॉटल १५००, सॅनिटरी नॅपकिन्स १०००, क्लोरीन पावडर ७५ किलो, मॅगी नुडल्स ३००० पॅकेट, १५०० नग माचीस आणि १५०० नग मास्क इत्यादी वस्तूंची मदत केली, या साहित्याचे गरजू नागरिकांना न्याय्य वाटप व्हावे यासाठी तसेच संकटात शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था यांच्यासह असंख्य सामाजिक कार्यकर्ते हेही अहोरात्र मदतकार्य करत आहेत. काम करताना या सर्वांची ऊर्जा टिकून रहावी याकरिता या सर्व ‘फ्रंटलाईन वर्कर’साठी ओ आर एस एनर्जी ड्रिंकचे दहा हजार पॅकेटही उपलब्ध करून दिले आहेत. मदत व बचावकार्य करत असताना काही अपघात झाल्यास प्रथमोपचार करण्यासाठी ८०० प्रथमोपचार पेट्यांचाही या मदत साहित्यात समावेश करण्यात आला आहे.
पलूस तालुक्यातील औदुंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला आमदार रोहित पवार यांनी भेट दिली, त्या भागात पुराच्या पाण्यामुळं रस्त्यावर साठलेला गाळ काढण्याचं काम तिथले कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यामार्फत सुरू होतं. आमदार रोहित पवार यांनी स्वतः हातात फावडे घेऊन त्यांना मदत देखील केली. यावेळी आमदार अरुण अण्णा लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.