तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
समाजातील सीमांत घवटक व स्त्रीसबलीकरणावर भर देणारी, भव्य शैक्षणिक व सामाजिक ट्रस्ट अंजुमन-ए-इस्लाम, मुंबई ही सर्वसमावेशक संघटना आहे. आपल्या 97 शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून अंजुमन-ए-इस्लाम, विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम वयापासून म्हणजेच पूर्व प्राथमिक व प्राथमिक ते थेट पदव्युत्तर व संशोधन आदी शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर दर्जेदार शिक्षण देत आहे. या सर्व बाबींचा विचार करून अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्यावतीने यंदाच्या वर्षी सर सय्यद एक्सलेन्स ॲवॉर्ड ऑनलाईन झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रोख एक लाख रुपये, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह असे असून हे पुरस्कार वितरण समारंभ शनिवार दि. 17 ऑक्टोबर 2020 रोजी ऑनलाईन पार पडला. या कार्यक्रमात सर सय्यद इंटरनॅशनल एक्सलेन्स ॲवॉर्ड हे अमेरिकेचे प्रा. गेल मिनॉल्ट यांना प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मेघालय राज्याचे राज्यपाल मा. श्री. सत्य पाल मलिक तर अध्यक्षस्थानी अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. तारीक मन्सुर, रजिस्ट्रार अब्दुल हामीद (आपीएस), वेबमास्तर डॉ. फैजा अब्बासी, प्रा. शाहीद शकील आदी उपस्थित होते. अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचेवतीने अध्यक्ष डॉ. जहीर काझी यांनी हे पुरस्कार स्वीकारला. सत्काराला उत्तर देताना डॉ. जहीर काझी म्हणाले की, अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने आमच्या संस्थेला हे पुरस्कार दिल्याबद्दल मी माझ्या संस्थेच्यावतीने आभार मानतो. अंजुमन-ए-इस्लाम ही शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देत आहे.
या संस्थेमधून एकाचवेळी सुमारे एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. अभियांत्रिकी, युनानी मेडिसीन, आर्किटेक्चर, फार्मसी, हॉस्पिटलिटी, केटरिंग व हॉटेल मॅनेजमेंट, लॉ, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, होम सायन्स, टीचर्स ट्रेनिंग व इतर कौशल्यविकास कार्यक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रम या संस्थेमार्फत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरात महाविद्यालय कार्यरत आहेत.
या संस्थेच्या माजी विद्यार्थी जगभरात वेगवेगळ्या नवाजलेल्या संस्थेमध्ये वाणिज्य, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, आरोग्यशास्त्र या क्षेत्रात आपली सेवा बाजावत आहे. सोलापूर येथे व्यावसायिक अभ्यासक्रमसोबत प्राथमिक ते हायस्कूलपर्यंत इंग्रजी माध्यमची शाळा सुरू असून होटगी येथे संस्थेच्यामार्फत यावर्षी फॉर्मसी व इतर पदवीचे अभ्यासक्रमाचे महाविद्यालय सुरू करण्याचा मानस आहे. सोलापूर सेंटरचे को-ऑर्डिनेटर रियाजअहमद पीरजादे यांनी हे पुरस्कार संस्थेला मिळाल्याबद्दल अध्यक्ष डॉ. जहीर काझी व सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.
कार्यक्रमाची सुरूवात कुराण पठण करून करण्यात आली. कुलगुरू प्रा. तारीक मन्सुर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. मुजाहिद बेग यांनी आभार मानले तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.