पालकमंत्र्यांना सामाजिक कार्यकर्त्यांकडून निवेदन : दक्ष अधिकाऱ्यांवरील अन्याय रोखण्याची मागणी
बेळगाव : मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याविरुद्ध षड्यंत्र करून त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आयुक्त पदावर रुजू झाल्यापासून प्रामाणिकपणे बेळगावकरांच्या सेवेत त्यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. तरी राजकीय हेतूने प्रेरित होऊन काही जण त्यांच्याविरुद्ध षड्यंत्र रचत आहेत. शुक्रवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन भ्रष्टाचार निर्मूलन परिवाराच्यावतीने यासंबंधी निवेदन देण्यात आले असून, दक्ष अधिकाऱ्यांवर राजकीय हेतूने होणारा अन्याय रोखण्याची मागणी करण्यात आली आहे. परिवाराचे अध्यक्ष सुजीत मुळगुंद, कामगार नेते अॅड. एन. आर. लातूर यांनी दक्ष अधिकाऱ्यांबद्दल सुरू असलेल्या षड्यंत्राविषयी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करून कामे
अशोक दुडगुंटी हे आयुक्त पदावर रुजू झाल्यानंतर बेळगावकरांच्या हिताची कामे होऊ लागली आहेत. सर्वसामान्य नागरिकांची कामे मनपा कार्यालयात सुलभरित्या होऊ लागली आहेत. बेकायदा व्यवहारांना चाप बसला आहे. सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करत त्यांनी आपली कामे सुरूच ठेवली आहेत. तरी त्यांच्याविरुद्ध षड्यंत्र रचण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
आयुक्तांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न
यावेळी अॅड. एन. आर. लातूर, सुजीत मुळगुंद यांच्यासमवेत विनोद पाटील, रोहित लातूर, डी. एस. बिळगी, अनिल शिंदे, सुभाष कांबळे, यशवंत लमाणी, रेणूकराज एच. आदी उपस्थित होते. वर्षानुवर्षे तळ ठोकलेल्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून आयुक्तांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असून या षड्यंत्रातून दक्ष अधिकाऱ्यांना वाचविण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.