बेळगाव : शहापूर परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भक्तिमय वातावरणात विसर्जन मिरवणूक काढली. शहापूर परिसरातील काही मंडळांनी कपिलेश्वर तलाव तर काही मंडळांनी जुनेबेळगाव, नाझरकॅम्प वडगाव व जक्कीनहोंडा परिसरात श्रीमूर्ती विसर्जन केले. सायंकाळी 7 वाजता गणेशोत्सव मिरवणुकीला सुऊवात झाली. शहापूर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, आमदार राजू सेठ, गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, कार्याध्यक्ष रमेश सोनटक्की, नगरसेवक रवी साळुंखे, अमृत भाकोजी, केतन भाकोजी यांच्या हस्ते नवी गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये महाआरती करण्यात आली. या ठिकाणी मुस्लीम बांधवही उपस्थित होते. त्यामुळे मुस्लीम-हिंदू बांधवांचे एकतेचे दर्शन घडले. महाआरतीनंतर मिरवणुकीला सुऊवात झाली. यावेळी विविध ढोल पथकांनी या मिरवणुकीत सहभाग दर्शविला. काही मंडळांनी हरे राम हरे कृष्णांच्या तालावर सवाद्य मिरवणूक काढली.
शहापूर, खासबाग, वडगाव परिसरातील गणेशमूर्तींची मिरवणूक शहापूर परिसरातील विविध मार्गांवरून काढली. आनंदवाडी येथील गणेश उत्सव मंडळानेही भव्य मिरवणूक काढून गणेशमूर्तींचे विसर्जन केले. त्याचबरोबर विविध ढोल-ताशे पथकाबरोबरच काही मंडळांनी डीजेदेखील लावला होता. डीजे असलेल्या गणेशोत्सव मंडळांसमोर तरुणांनी गर्दी केली होती. शहापूर, जुने बेळगाव, वडगाव येथील गणेशमूर्तींचे विसर्जन जुने बेळगाव येथील कलमेश्वर तलावामध्ये करण्यात आले. त्याठिकाणी महापालिकेने सर्व ती सोय केली होती. सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती.