सहकार निवडणुक प्राधिकरणाकडून निवडणुक कार्यक्रम जाहीर; 5 डिसेंबरला मतमोजणी; उमेदवारी अर्ज भरण्यास 26 ऑक्टोबरपासून सुरुवात
कोल्हापूर प्रतिनिधी
बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचा निवडणुक कार्यक्रम गुरुवारी जाहीर करण्यात आला. कारखान्यासाठी 3 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 5 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तर निवडणुक प्रक्रीयेस 26 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे.
माजी आमदार के. पी. पाटील आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्यातील राजकीय वर्चस्वाच्या लढाईवरुन सध्या श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना चर्चेत आहे. निवडणुकीपूर्वीच दोन्ही बाजूनी आरोप- प्रत्यारोपामुळे गाजत असलेल्या बिद्री साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. यामुळे आता कारखाना कार्यक्षेत्रातील राजकीय घडामोडी गतीमान होणार आहेत. बिद्री कारखान्याचे कार्यक्षेत्र हे राधानगरी, भुदरगड, कागल आणि करवीर तालुक्यात आहे. या चार तालुक्यातील 218 गावे कारखाना कार्यक्षेत्रात आहेत. बिद्री कारखान्याच्या संचालक मंडळाची 10 ऑक्टोबर 2022 रोजी मुदत संपली आहे. दरम्यान निवडणूक कार्यक्रम सुरू झाल्यानंतर जून 2023 मध्ये सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुक प्रक्रीयेला 30 सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली होती.
बिद्री कारखान्यावर गेली अनेक वर्षे माजी आमदार के. पी. पाटील यांची सत्ता आहे. त्यांच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी आमदार आबिकटर यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे बिद्रीच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
सहकार निवडणूक प्राधिकरणने गुरुवारी कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार बिद्री कारखान्यासाठी 26 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर 2023 या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. दोन नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. वैध उमेदवारांची यादी तीन नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. तीन नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज माघार घेत येणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध होईल. तीन डिसेंबर रोजी मतदान व 5 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.