शारजाह-हैदराबाद विमानात बिघाड
वृत्तसंस्था/ कराची
इंडिगोच्या शारजाह-हैदराबाद विमानाला तांत्रिक बिघाडामुळे पाकिस्तानच्या कराचीत लँड करावे लागले आहे. या विमानाची कराचीच्या विमानतळावर तपासणी करण्यात आली. यादरम्यान प्रवाशांना आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्याचे इंडिगोकडून सांगण्यात आले. तर प्रवाशांना कराचीतून परत आणण्यासाठी कंपनीने दुसरे विमान पाठविण्याची तयारी चालविली होती. मागील दोन आठवडय़ांमध्ये कराचीत भारतीय एअरलाइन्सचे हे दुसरे लँडिंग आहे. यापूर्वी स्पाइसजेटच्या विमानालाही तांत्रिक बिघाडामुळे कराचीत लँडिंग करावे लागले होते.
तर गुरुवारी दिल्लीहून वडोदरा येथे जात असलेली इंडिगोची फ्लाइट 6ई-859 चे जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग झाले होते. विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याने खबरदारीदाखल इमर्जन्सी लँडिंग करविण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. तर 14 जुलै रोजी दिल्लीहून इम्फाळ येथे जात असलेले इंडिगोचे विमान खराब हवामानामुळे कोलकाता विमानतळावर उतरले होते. या विमानातून 141 जण प्रवास करत होते.