ग्राहक मेळाव्यात सीए राज बोळमल यांचे प्रतिपादन : रिक्षांसाठी कर्ज वितरण
बेळगाव : मराठा बँक ही बहुजन समाजाचा मानबिंदू आहे. या बँकेचा बेळगाव जिल्ह्यासह कर्नाटकात नावलौकिक आहे. बँकेच्यावतीने राबविण्यात आलेल्या अनेक योजनांचा खातेदारांना लाभ होत आहे. विशेष म्हणजे रिक्षांसाठी कर्ज देऊन बहुजन समाजातील अनेक गरजू युवकांना पत निर्माण करण्यात बँकेचे मोठे योगदान आहे, असे उद्गार सीए राज बोळमल यांनी मराठा बँकेने आयोजित केलेल्या ग्राहक मेळाव्याप्रसंगी काढले. मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार होते. प्रारंभी संचालक बाळासाहेब काकतकर यांनी प्रास्ताविक केले. यानंतर राज बोळमल यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. दिगंबर पवार व ज्येष्ठ संचालक बाळाराम पाटील यांच्या हस्ते बोळमल यांचा शाल, बुके व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
रिक्षा कर्जदारांना मार्गदर्शन करताना बोळमल यांनी आपल्या परिसरात प्रत्येक घरात आपला मोबाईल नंबर द्यावा. त्यामुळे अडीअडचणीच्या वेळी ग्राहकांना त्याचा फायदा होईल. त्यांच्याशी आपले आपुलकीचे नाते निर्माण होईल व आपल्याला व्यवसाय मिळेल. त्यानंतर ग्राहक मेळाव्यात संचालक मंडळाच्यावतीने रिक्षा एजंट यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक एल. एस. होनगेकर, बी. एस. पाटील, शेखर हंडे, सुनील अष्टेकर, विनोद हंगिरकर, मोहन चौगुले, लक्ष्मण नाईक, रेणू किल्लेकर, बी. बी. खंडागळे, ग्राहक, हितचिंतक उपस्थित होते. सूत्रसंचालन जनरल मॅनेजर संतोष धामणेकर यांनी केले. व्हा. चेअरमन नीना काकतकर यांनी आभार मानले.