ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची रेकी केल्याप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला काश्मीरमधून ताब्यात घेतले आहे. (Nagpur ATS arrests Jaish terrorist for RSS Reiki)
रईस अहमद असदुल्ला शेख असे एटीएसने ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. 15 जुलै 2021 ला रईस याने आरएसएस मुख्यालय तसेच डॉ. हेडगेवार स्मृती भवन संकुलाची रेकी केली होती. त्यानंतर त्याला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली होती. आता नागपूर एटीएसने त्याला प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या चौकशीदरम्यान, पाकिस्तानातील जैश संघटनेत बसलेल्या सूत्रधारांच्या सांगण्यावरून या दहशतवाद्याने नागपुरात रेकी केल्याचं उघड झालं आहे. यानंतर नागपूर पोलिसांच्या अधिकाऱ्यांनीही काश्मीरमध्ये जाऊन त्याची चौकशी केली होती. आता रईसला एटीएसच्या नागपूर युनिटने पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
रईसने जुलै 2021 मध्ये जैशच्या सांगण्यावरून नागपुरातील आरएसएसच्या कार्यालयाची रेकी केली होती. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने श्रीनगर ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर असा विमान प्रवास केला. त्यानंतर एका हॉटेलमध्ये रुम बूक केली आणि रिक्षाने दोन्ही ठिकाणांची रेकी केली. तसेच या ठिकाणांचा व्हिडीओ घेऊन त्याने तो हस्तकाला पाठवला होता. रईसला जम्मू-काश्मीरमधील पंपोर येथून ग्रेनेडसह अटक करण्यात आली होती.