क्रीडामंत्री गोविंद गावडे यांची घोषणा
क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
खेळाडूंच्या जीवनात व क्रीडा क्षेत्रात फिजिओथेरेपीचे योगदान महत्त्वाचे आहे. खेळताना दुखापत होणाऱया खेळाडूंना पुन्हा मैदानात उभे करण्याची क्षमता बाळगतानाच, त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी समुपदेशक म्हणूनही फिजिओथेरेपिस्ट हा क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचा घटक ठरतो. गोव्यात होणाऱया आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये फिजिओथेरेपी क्षेत्रातील तज्ञांची गरज भासणार असून या क्षेत्रात कार्यरत असलेल्या गोव्यातील फिजिओना संधी दिली जाईल, अशी घोषणा क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी केली.
फोंडा येथे सुरु असलेल्या दोन दिवशीय राष्ट्रीय फिजीओथेरेपी परिषदेच्या समारोप सोहळय़ात मंत्री गोविंद गावडे बोलत होते. देशभरातील विविध राज्यातून सहाशेहून अधिक फिजिओथेरेपी प्रशिक्षणार्थी व तज्ञ या परिषदेत सहभागी झाले आहेत. यावेळी व्यासपीठावर आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. इफ्तिकार अली, सचिव डॉ. केतन भाटीकर, डॉ. अतूल सिंग व अन्य मान्यवर उपस्थित होते. खेळाडूंच्या जीवनात फिजिओ प्रशिक्षका एवढाच प्रभावी मार्गदर्शक असतो. उत्कृष्ट फिजिओ हा खेळाडूंची क्षमता वाढविण्याबरोबरच त्यांच्यातील कौशल्यांची जाणिव करुन देतो. तसेच खेळाडूंकडून अधिक चांगली कामगिरी करुन घेऊ शकतो, असे मंत्री गावडे पुढे म्हणाले. खेळाडूंनी दुखापत लपवून न ठेवता वेळीच फिजिओंना त्याची कल्पना द्यावी. ज्यामुळे त्यावर योग्यप्रकारे उपचार होऊन, पुढील गंभीर प्रसंग टळू शकतो, असा सल्लाही त्यांनी दिला.
परिषदेच्या आयोजनामध्ये सहकार्य केलेल्या व्यक्तींचा मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते यावेळी सन्मान करण्यात आला.