मुख्य जिल्हासत्र न्यायालयाने दिला जामीन
प्रतिनिधी/ बेळगाव
मुलाचा सुपारी देऊन खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी मुरगोड पोलीस स्थानकामध्ये वडिलावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी होऊन मुख्य जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एल. विजयलक्ष्मी देवी यांनी जामीन मंजूर केला आहे.
मारुती निंगाप्पा तिगडी असे त्याचे नाव आहे. त्याचा मुलगा संगमेश याला दारूचे व्यसन होते. तो दारू पिऊन घरामध्ये भांडण, मारामारी करणे असे प्रकार करत होता. पैसे द्या म्हणून वडिलांकडे तगादाही लावत होता. सतत होणाऱ्या या त्रासामुळे कंटाळून मारुती याने मुलगा संगमेश याचा खून करण्यासाठी दोघांना सुपारी दिली, असा आरोप करण्यात आला आहे.
दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी मयत संगमेश हा घरी परतला नाही. याबद्दल त्याचे वडील मारुती याने त्याचा विभक्त राहिलेला मोठा मुलगा महेशकडे विचारणा केली. संगमेश घरी आला नाही असे सांगितले. त्यानंतर काहीवेळाने गोकाक-मुरगोड रस्त्यावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी पाहणी केली असता मृतदेह संगमेशचाच असल्याचे आढळून आले.
मुरगोड पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता वडील मारुती तिगडी यानेच सुपारी देऊन खून केल्याचे उघडकीस आले. दोघांनी संगमेशला कुट्टरनट्टी गावातील डोंगरावर नेवून दगडाने ठेचून खून केला होता, असा आरोप करण्यात आला. याप्रकरणी वडिलावरही गुन्हा दाखल केला होता. मात्र न्यायालयाने 1 लाख रुपयांचे हमीपत्र आणि तितक्याच रकमेचा एक जामीनदार या अटींवर जामीन मंजूर केला आहे. या संशयिताच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचन्नावर, अॅड. शंकर बाळनाईक, अॅड. चिदंबर होनगेकर, अॅड. महेश मजुकर यांनी काम पाहिले.