प्रतिनिधी/सातारा
सातारा शहर व नव्याने समाविष्ट भागामध्ये डेंगू व मलेरिया साथ रोग प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या सुचना मुख्यधिकारी अभिजित बापट यांनी आरोग्य विभागास दिल्या आहेत. त्या अनुषंगाने येथील आरोग्य विभागाम़ार्फत प्रभाग निहाय औषध फवारणी व अबेटिंग करण्यात आले. तसेच मुख्याधिकारी यांनी नागरिकांना आपला परिसर स्वच्छ ठेवणे, इतर कोणत्याही ठिकाणी पाणी साठणार नाही याची दक्षता घेणे, संडास टाकी वरील पाईप जळीने झकाणे, एक दिवस कोरडा पाळणे असे आवाहन केले आहे.
कारण नुकतेच करंजे परिसरात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्हा हिवताप विभागाच्या पथकाने या परिसरातील 130 घरांना भेट देऊन डेंग्यू अळ्यांचा शोध घेतला. यावेळी 15 घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या. तसेच सदरबझार परिसरात 100 घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. जिल्ह्यासह सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून साथ रोगांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे हिवताप विभागाच्या आरोग्य सेवकांकडून करंजे येथील चार नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून अनेकांना डेंग्यूची तपासणी करण्याचा सल्ला यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.