वृत्तसंस्था / अयोध्या
अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानी साकारत असलेल्या भव्य राममंदिराचा ‘पवित्रीकरण’ विधी 22 जानेवारी 2024 या दिनी होण्याची शक्यता आहे, अशी घोषणा राममंदिर निर्माण समितीने केली आहे. या सोहळ्याला ‘धर्मप्रतिष्ठापना’ विधी किंवा सामान्य भाषेत उद्घाटन सोहळा असेही म्हणतात. हा विधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते केला जाणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अद्याप या समारंभाची तिथी पूर्णत: निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र 22 जानेवारीलाच हा सोहळा होईल हे सर्वसाधारणत: निर्धारित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला अद्याप ही तिथी कळविण्यात आलेली नाही. पण सज्जता त्या दृष्टीने करण्यात येत आहे. 22 जानेवारीला हा विधी केला गेल्यास 24 जानेवारीपासून सर्व रामभक्तांसाठी मंदीर मुक्त करण्यात येईल.
मूर्तीच्या भालावर सूर्यकिरण
पवित्रीकरण समारंभाच्या दिनी मंदिराच्या गर्भगृहात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापनाही करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम होत असताना काही काळ मूर्तीच्या भालस्थानी (कपाळावर) काही काळ सूर्याचे किरण पडतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी एका विशेष उपकरणाची निर्मिती बेंगळूर येथे करण्यात येत आहे. या विशेष उपकरणाची निर्मिती शास्त्रज्ञांकडून केली जात आहे. या उपकरणाची परीक्षणेही करण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून या समारंभांचे रीतसर निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच देण्यात येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.