वारणानगर,प्रतिनिधी
Kolhapur Leopard News : क. सातवे ता. पन्हाळा येथील चोरजाळे शेत मळ्यात ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने चरायला आलेल्या मेढ्यांच्या कळपावर हल्ला करून त्यातील एका मेंढीला ऊसात नेवून तिच्यावर ताव मारत फडशा पाडला.
मंगळवार (दि-२) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सदाशिव कणसे यांच्या चोरजाळे या शेत मळ्यात ही घटना घडली. यापूर्वी बच्चे सावर्डे येथील शेताल बिबट्याचा वावर होता. आज सावर्डे जवळच असलेल्या सातवे येथे बिबट्याने मेंढीवर हल्ला चढवून तिचा फडशा पाडल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.
आनंदा नवलप्पा मरगाळे यांनी चरायला सोडलेल्या शेळ्या-मेंढ्याचा कळप घराकडे घेऊन येत होते. यावेळी ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप मारून मेंढीवर हल्ला करून उसात घेऊन गेला याघटनेने मरगाळे यांनी त्याचा पाठलाग केला. पण, तो अंगावर धावून येण्यासाठी सरसावताच त्याचे गांभीर्य ओळखून मरगाळे मागे पळून आले एवढे साहस दाखवूनही त्यांना मेंढीला वाचवता आले नाही.
पन्हाळा वन विभागाला याची माहिती मिळताच वनरक्षक अमर माने वनसेवक रंगराव उदाळे, पांडुरंग पाटील तसेच तानाजी पाटील,सातवे ग्रामपंचायतीचे कर्मचारी सुदाम घाटगे,सागर कोळी,दगडू वक्टे,शेतकरी ग्रामस्थ यांनी बिबट्याचा एक तास शोध घेतला. परंतु बिबट्या मिळून आला नाही. परंतु, ऊसाच्या शेतात बिबट्याने मेंढी खाऊन पाय व आतडी कोथळा तिथेच टाकलेला व पायाचे ठसे आढळून आले.
जनावरांचे गोठे बंदीस्त करा
शेतमळ्यात असणारे जनावरांचे गोठे बंदीस्त करा. रात्रीच्या वेळी लाईट चालू ठेवा, शेतात गेल्यावर सभोवार पाहणी करून खात्री करून शेतातील कामे शेतकऱ्यांनी करावीत असे आवाहन वनरक्षक अमर माने यांनी केले आहे.