सनरायजर्स हैदराबादचा 3 धावांनी निसटता विजय
मुंबई / वृत्तसंस्था
शेवटच्या टप्प्यात टीम डेव्हिडच्या फटकेबाजीने रंग भरला असला तरी मुंबई इंडियन्सला आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आणखी एक पराभव पत्करावा लागला. सनरायजर्स हैदराबादने 20 षटकात 6 बाद 193 धावा केल्यानंतर मुंबई इंडियन्सला 20 षटकात 7 बाद 190 धावांवर समाधान मानावे लागले. टीम डेव्हिड एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाल्यानंतर भुवनेश्वरने 19 वे षटक निर्धाव टाकले आणि यानंतर मुंबईची शेवटच्या षटकात निराशा झाली. त्यांचा हा 13 सामन्यातील दहावा पराभव आहे.
विजयासाठी 194 धावांचे आव्हान असताना रोहित शर्मा (48), इशान किशन (43), टीम डेव्हिड (46) यांनी आक्रमणावर भर दिला. मात्र, अन्य फलंदाज ठरावीक अंतराने बाद होण्याचा सिलसिला अव्याहत सुरु राहिला आणि मुंबईची अंतिमतः निराशा झाली. या हंगामात वेगवान गोलंदाजीचे अनेक विक्रम प्रस्थापित करत असलेल्या उमरान मलिकने येथे 23 धावात 3 बळी घेतले.
प्रारंभी, राहुल त्रिपाठीने 44 चेंडूत 76 धावांची आतषबाजी केल्यानंतर सनरायजर्स हैदराबादने वानखेडे स्टेडियमवरील या लढतीत 6 बाद 193 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. हंगामातील तिसरे अर्धशतक साजरे करताना त्रिपाठीने 9 चौकार, 3 षटकार फटकावले. त्याला प्रियम गर्ग (42) व निकोलस पूरन (38) यांची समयोचित साथ लाभली.
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर गर्गला बढतीवर पाठवण्याची चाल हैदराबादसाठी उत्तमरित्या फळली. 21 वर्षीय गर्गने त्रिपाठीसमवेत 78 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. त्यापूर्वी बहरातील अभिषेक शर्मा (9) डावातील तिसऱया षटकात स्वस्तात बाद झाला. 10 धावांवर महत्त्वपूर्ण जीवदान लाभलेल्या गर्गने याचा पुरेपूर लाभ घेत 4 चौकार व 2 षटकारांसह 26 चेंडूत 42 धावांची आतषबाजी केली. त्रिपाठीने मुंबईच्या गोलंदाजांचा उत्तम समाचार घेण्यात अजिबात कसर सोडली नाही. त्याने डावातील पाचव्या षटकात जसप्रित बुमराहला (1-32) एक षटकार व लागोपाठ चौकार फटकावले. त्रिपाठी व गर्ग यांनी पॉवर प्लेमध्ये 57 धावा वसूल केल्या आणि षटकामागे जवळपास 10 ची सरासरी ठेवली. पुढे गर्गने मध्यमगती गोलंदाज रमणदीप सिंगकडे (3-20) परतीचा झेल दिल्यानंतर पूरन चौथ्या स्थानी बढतीवर आला. डावखुऱया पूरनने डावातील 13 व्या षटकात रिले मेरेडिथला लाँगऑनकडे व डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने सलग षटकार खेचले. त्यानंतर पुढील षटकात मयांक मार्कंडेला (0-31) एक चौकार व एका षटकारासाठी फटकावले.
मधल्या टप्प्यात पूरन, त्रिपाठी व मॅरक्रम यांना अवघ्या 8 चेंडूंच्या अंतरात बाद करत मुंबईने किंचीत कमबॅक केले. तळाच्या क्रमवारीत फलंदाजीला उतरलेल्या कर्णधार केन विल्यम्सनला झगडत रहावे लागले. तो येथे 8 धावांवर नाबाद राहिला. 200 पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य समोर ठेवून फलंदाजी करणाऱया सनरायजर्सला शेवटच्या 2 षटकात केवळ 1 चौकारासह 19 धावा जमवता आल्या आणि यानंतर 20 षटकात 6 बाद 193 धावांपर्यंत त्यांना मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक
सनरायजर्स हैदराबाद ः 20 षटकात 6 बाद 193 (राहुल त्रिपाठी 44 चेंडूत 9 चौकार, 3 षटकारांसह 76, प्रियम गर्ग 26 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 42, निकोलस पूरन 22 चेंडूत 2 चौकार, 3 षटकारांसह 38. अवांतर 9. रमणदीप सिंग 3-20, डॅनिएल सॅम्स 1-39, रिले मेरेडिथ 1-44, बुमराह 1-32).
मुंबई इंडियन्स ः 20 षटकात 7 बाद 190 (टीम डेव्हिड 18 चेंडूत 3 चौकार, 4 षटकारांसह 46, इशान किशन 34 चेंडूत 43, रोहित शर्मा 36 चेंडूत 48. रमणदीप सिंग 6 चेंडूत नाबाद 14. अवांतर 14. उमरान मलिक 3-23, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार प्रत्येकी 1 बळी).
टीम डेव्हिडचा 18 चेंडूत 46 धावांचा झंझावात, पण…!
पाचव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या टीम डेव्हिडने अवघ्या 18 चेंडूत 46 धावांची आतषबाजी केली. यात 3 चौकार व 4 षटकारांचा समावेश राहिला. त्याने आपले चारही षटकार डावातील 18 व्या षटकात नटराजनला खेचले, त्यावेळी मुंबईला अचानक विजयाच्या आशाअपेक्षा जाणवल्या. डेव्हिडने षटकातील पहिला चेंडू लाँगऑफकडे षटकारासाठी पिटाळला तर तिसरा व चौथा चेंडू स्क्वेअर लेग तर पाचवा चेंडू लाँगऑनच्या दिशेने फटकावत आणखी सलग 3 षटकार नोंदवले. दोन वाईड टाकले गेल्याने या षटकातील पहिल्या 5 चेंडूत मुंबईच्या खात्यावर एकूण 26 धावा नोंदवल्या गेल्या. मात्र, याच षटकातील शेवटच्या चेंडूवर टीम डेव्हिड धावचीत झाला आणि मुंबईला मोठा धक्का बसला.
भुवनेश्वरची मेडन-विकेट ओव्हर आणि सामन्याची समीकरणे बदलली!
टीम डेव्हिडच्या फटकेबाजीमुळे रंग भरलेल्या या लढतीत मुंबईला शेवटच्या 2 षटकात 19 धावांची आवश्यकता होती. पण, भुवनेश्वरने 19 वे षटक निर्धाव टाकत एक बळीही घेतला आणि इथेच या सामन्याची सर्व समीकरणे बदलून गेली. भुवनेश्वरच्या निर्धाव षटकानंतर मुंबईसमोर शेवटच्या षटकात 19 धावा आवश्यक होते आणि हे आव्हान त्यांना अजिबात पेलवले नाही.