वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रविवारी रात्री ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचे मेडिकल बुलेटीनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर कार्डिओ न्यूरो सेंटरच्या कार्डियाक केअर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या आजारपणाचे वृत्त समोर येताच त्यांचे समर्थक चिंता व्यक्त करत आहेत. सर्वजण त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
जी किशन रेड्डी हे तेलंगणाचे रहिवासी असून ते पूर्वोत्तर क्षेत्राचे सांस्कृतिक, पर्यटन आणि विकास मंत्री आहेत. पोटाच्या वरच्या भागात अचानक दुखण्याचा त्रास सुरू झाल्यानंतर रेड्डी यांना रविवारी रात्री उशिराने 11 वाजण्याच्या सुमारास उपचारार्थ दिल्ली एम्समध्ये हलवण्यात आले. रेड्डी शनिवारपर्यंत म्हणजेच 29 एप्रिलपर्यंत पूर्णपणे बरे होते. त्यांनी तेलंगणातील सिकंदराबाद रेल्वे स्थानकाला भेट दिली. तसेच त्यांनी ग्लोबल टुरिझम इन्व्हेस्टर्स समिटमध्येही हजेरी लावली होती.
1977 मध्ये राजकारणात
जी. किशन रेड्डी हे अनेक दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत. 1977 मध्ये त्यांनी जनता पक्षात युवा नेता म्हणून प्रवेश केला. यानंतर त्यांनी 1980 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2012 च्या सुमारास जेव्हा तेलंगणा राज्य स्थापनेची चळवळ सुरू असताना त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2019 मध्ये त्यांनी सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता.