केंद्रीय उद्योगमंत्री पीयूष गोयल यांचा सल्ला, गोव्यात ’होम स्टे’ ला प्रचंड वाव असल्याचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
मालदीवच्या धर्तीवर गोव्यानेही स्वत:च्या पर्यटन व्यवसायाचे मार्केटिंग करून पर्यटकांना आकर्षित करावे. गोव्यात ‘होम स्टे’ ची प्रचंड क्षमता आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेद्वारे गोव्यालाही मुद्रा कर्ज मिळू शकते. पर्यटनाला चालना देण्याचा हा एक अनोखा मार्ग आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले.
जी 20 अंतर्गत स्टार्टअप 20 च्या तिसऱ्या बैठकीनिमित्त गोव्यात आलेले केंद्रीय मंत्री पणजीतील उद्योग जगताच्या नेत्यांशी संवाद साधताना बोलत होते. गोव्यात ‘होम स्टे’ ला प्रोत्साहन देणे आणि दर्जेदार पर्यटकांना आकर्षित करून पर्यटन क्षमतेचा लाभ घेण्यासाठी सरकारने धोरण विकसित करावे, असे आवाहनही त्यांनी केले. गोव्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी लवकरच राज्य आणि केंद्रीय मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा लघु कार्यगट तयार करण्यात येईल, असे आश्वासन गोयल यांनी दिले.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मालदीव कशाप्रकारे स्वत:चे मार्केटिंग करत आहे त्याचा गोव्याने अभ्यास करावा. गोवा राज्य आता केवळ हिवाळी पर्यटनापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. येथे बारामाही पर्यटन चालते, त्यासाठी दर्जेदार पर्यटक गोव्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सरकारकडून झाले पाहिजेत, असे गोयल म्हणाले.
पर्यटनाबरोबरच गोव्यात फार्मा उद्योगाचाही राष्ट्रीय स्तरावर विस्तार करून निर्यातीचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न झाले पाहिजेत. त्या संदर्भात औषध उद्योगातील 20-30 अग्रेसर कंपन्यांकडे चर्चा करू. गोवा, गुजरात, हैदराबाद, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यासारखी अनेक राज्ये फार्मास्युटिकल क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत. सरकार काही राज्यांमध्ये 4-5 फार्मास्युटिकल हब तयार करण्याचा विचार करत आहे. त्यावर लवकरच चर्चा करण्यात येईल, असे गोयल यांनी पुढे सांगितले.