रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामामुळे वाहने अडकण्याचे प्रकार
प्रतिनिधी /बेळगाव
जुन्या धारवाड रोडचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गॅसवाहिनी तसेच विविध वाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी रस्त्यावर खोदाई करून ठेवण्यात आल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः होसूर, बसवाण गल्ली ते संभाजी गल्ली क्रॉसदरम्यान वाहतूक कोंडी होत आहे.
शहरातील विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणानंतर आता जुन्या धारवाड रोडच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. लेंडी नाला ते जुने बेळगाव क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधीची तरतूद करण्यात आली आहे. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी विविध कामे सुरू करण्यात आली असून सध्या गॅसवाहिन्या घालण्यासाठी लेंडी नाला ते संभाजी गल्ली क्रॉसपर्यंतच्या रस्त्यावर खोदाई केली आहे.
एका बाजूला खोदाई करून विविध वाहिन्या घातल्या जात असल्याने वाहनधारकांना अडचण होत आहे. बसवाण गल्ली ते संभाजी गल्ली क्रॉसपर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. सकाळच्या दरम्यान शाळेला जाणाऱया विद्यार्थी आणि पालकांच्या वाहनांची रहदारी मोठय़ा प्रमाणात असते. अशातच विविध व्यवसाय या परिसरात असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनधारकांना अडकून पडावे लागत आहे. या रस्त्याशेजारी चरी खोदण्यात आल्याने वाहनधारकांना ये-जा करणे मुश्कील बनत आहे. त्यामुळे हाती घेण्यात आलेली विकासकामे तातडीने पूर्ण करावीत व वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे.
अवजड वाहनांची वर्दळ
रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी विविध कामे सुरू केली असतानाही या रस्त्यावरील अवजड वाहनांची वर्दळ सुरूच आहे. वास्तविक पाहता या रस्त्यावरील अवजड वाहतूक अन्यमार्गाने वळविणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गापासून शहरात येणारी वाहने गांधीनगरमार्गे वळविण्यात आल्यास जुने बेळगाव ते लेंडी नाल्यापर्यंतच्या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ होणार नाही.