कन्नड चित्रपटाचा हिंदी रिमेक लवकरच
दक्षिण भारतीय भाषांमधील चित्रपटांचे हिंदी रिमेक तयार करण्याचे सत्र सुरूच आहे. आता कन्नड चित्रपट ‘दीया’चा हिंदी रिमेक ‘डियर दीया’ या नावाने लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. कन्नड चित्रपट ‘दीया’ फेब्रुवारी 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाला 8.2 आयएमडीबी रेटिंग प्राप्त झाले होते. या चित्रपटाचा तेलगू रिमेक ‘डियर मेघा’ या नावाने सप्टेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि तो देखील गाजला होता.
हिंदी रिमेकची निर्मिती नेट्रिक्स एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडकडून करण्यात आली आहे. मूळ कन्नड चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा पृथ्वी अंबर हिंदी चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. कन्नड चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे के.एस. अशोक हेच हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
या चित्रपटात त्रिकोणी पेमकथा दर्शविण्यात आली आहे. कन्नड चित्रपटात एकही गाणे नव्हते, तर हिंदी चित्रपटात 4 गाण्यांचा समावेश करण्यात आला आहे. हा चित्रपट 10 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे.