नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने तृणमूल काँग्रेसचा नेता साकेत गोखले याला अटक केली आहे. काही उपक्रमांसाठी लोकांकडून गोळा करण्यात आलेल्या पैशाचा गोखले याने अपहार केला, असा आरोप आहे. ही रक्कम साधारणतः 1 कोटी 4 लाख रुपयांची आहे. त्याला गुजरातमध्ये अटक करण्यात आली. त्याला लवकरच न्यायालयासमोर उपस्थित करण्यात येईल.
मोर्बी पूल पडल्यानंतर गोखले याने एक वृत्त प्रसारित केले होते. त्यानुसार पंतप्रधान मोदी यांनी पूल पडल्यानंतर मोर्बीला भेट दिली होती. या भेटीसाठी गुजरात सरकारने 30 कोटी रुपयांचा खर्च केल्याचे गोखले याने या वृत्तात म्हटले होते. मात्र, नंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने हे वृत्त बनावट असल्याचे स्पष्ट केले होते.
त्यानंतर त्याने लोकांकडून पैसे गोळा करण्यास प्रारंभ केला होता. या पैशाचा उपयोग त्याने स्वतःच्या कारणांसाठी केला असा आरोप गुजरात पोलिसांनी ठेवला होता. नंतर ईडीने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. प्रथमदर्शनी पुरावा असल्याचे आढळल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरु आहे.