मस्क यांनी जनतेचे मत जाणून घेतल्यावर हटविली बंदी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ट्विटरवर परतले आहेत. ट्विटरचे नवे बॉस एलन मस्क यांनी ट्रम्प यांच्यावरील बंदी हटविण्यात आल्याचे जाहीर केले आहे. ट्विटरवर पोल घेतल्यावर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. 1.5 कोटीहून अधिक ट्विटर युजर्सनी यात भाग घेतला होता. 52 टक्के लोकांनी ट्रम्प यांच्यावरील बंदी हटविण्यात यावी असे मत व्यक्त केले होते. पोल संपुष्टात आल्यावर मस्क यांनी ‘वोक्स पोपुली, वोक्स देई’ असे लॅटिन भाषेतील एक वाक्य नमूद केले. याचा अर्थ ‘लोकांचा आवाज हाच देवाचा आवाज आहे’ असा होतो.
6 जानेवारी 2021 रोजी ट्रम्प यांच्यावर ट्विटरकडून बंदी घालण्यात आली होती. तेव्हा त्यांचे 88 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स होते. रविवारी पहाटे ट्रम्प यांचे ट्विटर अकौंट पुन्हा सक्रीय झाल्यावर 50 मिनिटातच त्यांचे फॉलोअर्स 10 लाखांहून अधिक झाले होते. ट्विटरवर ट्रम्प हे पुन्हा सक्रीय होणार की नाहीत हे अद्याप स्पष्ट नाही. त्यांनी स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशल तयार करविले आहे.
2021 मध्ये कॅपिटॉल हिल येथील हिंसेनंतर ट्रम्प यांनी यात सामील स्वतःच्या समर्थकांना ट्विटरवर क्रांतिकारक संबोधिले होते. याप्रकरणी ट्विटरने कारवाई करत ट्रम्प यांच्या अकौंटवर कायमस्वरुपी बंदी घातली होती. ट्विटर खरेदी करताना एलन मस्क यांनी ट्रम्प यांच्यासह अनेक जणांवरील बंदी हटविण्याच्या बाजूने भूमिका मांडली होती. मस्क हे नेहमीच स्वतःला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच मोठा पक्षधर ठरवत आले आहेत. मस्क हे चांगले व्यक्ती असून ते ट्विटरमध्ये सुधारणा घडवून आणतील अशी अपेक्षा असल्याचे ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हटले होते.