प्रतिनिधी / कोयना वसाहत
कराड तालुक्यातील जखिणवाडी येथील मेंढवडा या परिसरातील विहिरीत बिबटय़ाचे दोन बछडे पडल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. विहीर मालक सुखदेव येडगे यांच्यासह ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी वनविभागाला तातडीने याची माहिती दिली. दरम्यान विहिरीत पडलेल्या बिबटय़ांच्या बछडय़ांची विहिरीत जीव वाचवण्याची धडपड बराचवेळ सुरू होती. वनविभागाच्या पथकाने वेळेत घटनास्थळी धाव घेत बिबटय़ाच्या बछडय़ांना लोखंडी पिंजऱ्याच्या मदतीने बाहेर काढण्यात शनिवारी दुपारी एकच्या सुमारास यश मिळवले.
वनविभागाचे हे रेस्क्यू ऑपरेशन सुमारे दोन तास सुरू होते. घटनास्थळी मेंढवडा या परिसरात बिबटय़ांचा वावर कायमच असतो. या परिसरात विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला वाचवण्यात यश आले. वाचवलेल्या बछडय़ांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. दोन्ही बछडे सुखरूप असून त्यांची आणि मादी बिबट्याची भेट घडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वन विभागाने सांगितले.