मित्रांसोबत गेले होते ट्रिपवर ः सरोवरात बुडून गमावला जीव
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनच्या उत्तर आयर्लंडमध्ये एका सरोवरात बुडाल्याने दोन भारतीय मुलांचा मृत्यू झाला आहे. जोसेफ सेबेस्टियन आणि रुवेन साइमन हे दोघेही केरळचे रहिवासी होते. दोघेही स्वतःच्या 4 मित्रांसोबत सुटीनिमित्त लंडनडेरी शहरातील ‘एनघ लॉफ’ सरोवराच्या ठिकाणी पोहोचले होते. जोसेफ अन् रुवेन हे 16 वर्षांचे हेते.
उत्तर आयर्लंडमधील केरळ असोसिएशनने दोन्ही किशोरवयीनांना श्रद्धांजली वाहिली आहे. एनघ लॉफमध्ये झालेल्या रुवेन अन् जोसेफ यांच्या दुर्दैवी मृत्युमुळे आम्ही दुःखी आहोत. या अवघडसमयी आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत असे असोसिएशनकडून म्हटले गेले.
दोन किशोरवयीन बुडाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेत शोधमोहीम हाती घेतली होती. दोन्ही मुलांना सरोवरातून बाहेर काढण्यात आले. यातील एकाचा मृत्यू झाला होता. तर दुसऱया मुलाची प्रकृती नाजूक होती. त्याला रुग्णालयात हलविण्यात आल्यावर डॉक्टरांनी त्यालाही मृत घोषित केल्याची माहिती उत्तर आयर्लंडमधील पोलीस निरीक्षक ब्रोगन यांनी सांगितले आहे.
जोसेफ अन् रुवेन हे मित्रांसोबत पोहण्यासाठी सरोवरात उतरले होते. यातील एक बुडू लागल्यावर दुसऱयाने त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली होती. परंतु दोघेही बुडाल्याचे त्यांच्या एका मित्राने सांगितले आहे. या सरोवरात 34 वर्षांनी अशाप्रकारची दुर्घटना घडल्याचे उद्गार स्थानिक आमदार मार्क एच. दुर्कानी यांनी काढले आहेत.