गोकाक पोलिसांची कारवाई, आतापर्यंत 16 जण ताब्यात
प्रतिनिधी /बेळगाव
केपीटीसीएल परीक्षा घोटाळाप्रकरणी संशयितांची धरपकड सुरूच आहे. सोमवारी गोकाक पोलिसांनी आणखी दोघा जणांना अटक केली असून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 16 वर पोहोचली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
बिराप्पा लक्ष्मण हणगंडी (वय 24, रा. हणगंडी), शिवानंद दुंडाप्पा हळ्ळूर (वय 23, रा. अरभावी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चार दिवसांत चौघा जणांना अटक झाली असून ही धरपकड सुरूच राहणार आहे. या प्रकरणातील आणखी काही संशयित फरारी आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
शिरहट्टी बी. के. येथे केपीटीसीएल परीक्षेसाठी उत्तरे लिहिताना प्रिंट काढण्यासाठी बिराप्पाने लॅपटॉप आणला होता. स्मार्टवॉचही याच तरुणाने खरेदी केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याजवळून 1 मोबाईल व 1 लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. तर शिवानंदने परीक्षेसाठी इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस वापरले आहे.
शिवानंदजवळून 5 मोबाईल संच व 1 इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त करण्यात आले आहे. या दोघा जणांना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दिवसेंदिवस या प्रकणाचा विस्तार वाढत चालला आहे.