पुलाची शिरोली / वार्ताहर
याबाबत घटनास्थळ व पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी, येथील थोरवत कॉलनीतील विजय बाबासो थोरवत, संजय परशराम थोरवत हे राहतात. शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शुभम गव्हाणे दिपक सिकंदर जानराव आणि अन्य अनोळखी दोन युवक विजय थोरवत यांच्या दारात आपापसात अश्लील शिवीगाळ करून भांडत होते. यावेळी विजय थोरवत यांनी आपल्या दारात थांबू नका असे सांगितले.
दरम्यान, विजय थोरवत यांच्या दारामध्ये फरशी बसवण्याचे काम सुरू होते. विजय थोरवत आणि त्यांचे चुलते संजय थोरवत हे त्या ठिकाणी काम पाहत थांबले होते. यावेळी वरील कारणावरून मनात राग धरून शुभम गव्हाणे व दिपक जानराव आणि अन्य दोघेजण विजय थोरवत यांना शिवीगाळ आणि लाथा बुक्क्याने मारहाण करू लागले. त्यातील एकाने धारदार शस्त्राने विजय याच्या पाठीवर, डाव्या खांद्यावर, डाव्या डोळ्याजवळ, उजव्या हाताच्या अंगठ्या जवळ वार करून जखमी केले.
यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या संजय परशराम थोरवत यांच्या मानेवरही धारदार शस्त्राने वार करण्यात आले. मारहाण करून संशयित आरोपीने पलायन केले. जखमींना तात्काळ उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील तपास करीत आहेत.