थकीत वेतनासाठी अखंडीत लढय़ानंतर मिळाला न्याय : शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत केएमसी कॉलेजमधील आर. एस. दामुगडे व एस. एम. शेख या दोन प्राध्यापकांची पात्रता विद्यापीठाने नाकारली होती. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून ते थकीत वेतन मिळावे म्हणून त्यांनी अखंडीत लढा दिला. या लढय़ाची दखल घेत या दोन्ही प्राध्यापकांना पात्रता देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे. सचिवपदी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे तर अध्यक्षपदी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.
शास्त्रीनगर परिसरातील शिवाजीराव मोरे कॉलेज बंद झाल्यानंतर हायकोर्टाच्या ऑर्डरनुसार आर. एस. दामुगडे आणि एस. एम. शेख केएमसी कॉलेजमध्ये मर्ज (जॉईन) झाले. परंतू गेल्या तीन वर्षापासून या प्राध्यापकांची पात्रता शिवाजी विद्यापीठाने नाकारली. आपण पात्र असतानाही वेतनापासून वंचित राहावे लागतेय म्हणून त्यांनी लढा दिला होता. तसेच 1999 पर्यंतच्या सर्व प्राध्यापकांना हायकोर्टाने सेट-नेट परीक्षेतून सुट दिल्याने दोन्ही प्राध्यापक पात्र ठरतात. त्यामुळे शनिवारी झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत या दोन्ही प्राध्यापकांच्या पात्रतेला मान्यता मिळाल्याने त्यांना तीन वर्षाचे वेतन व पेन्शनही मिळेल. विद्यापीठाच्या या निर्णयाचे दामुगडे आणि शेख यांनी स्वागत केले आहे. तसेच इतर कोणावर असा अन्याय होवू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. तसेच मिरज महाविद्यालयाला पी. जी. प्रवेशासाठी मान्यता दिली आहे. यासह अन्य शैक्षणिक निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आले.