वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथील श्री कंटिरवा स्टेडियमवर सुरू असलेल्या नवव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात यू मुम्बा संघाने तमिळ थलैवाजचा 39-32 अशा सात गुणांच्या फरकाने पराभव केला. यू मुम्बाचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे.
शुक्रवारच्या सामन्यात यू मुम्बा संघातील रायडर्स गुमान सिंग, आशिष आणि जय भगवान यांनी 30 गुण मिळविले. सामन्यातील सातव्या मिनिटाला नरेंदरच्या काही आक्रमक चढायांमुळे तमिळ संघाने यू मुम्बावर 6-4 अशी आघाडी मिळविली होती. तेराव्या मिनिटापर्यंत तमिळने आपली आघाडी 10-7 अशी राखली होती. त्यानंतर यू मुम्बा संघातील जय भगवान याने तामिळ थलैवाजचे 5 गडी बाद करत आपल्या संघाला 12-12 अशी बरोबरी साधून दिली.
मध्यंतरावेळी थलैवाजने यू मुम्बावर 16-15 अशी केवळ 1 गुणाची मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धात गुमान सिंगने आपल्या संघातर्फे शानदार चढाया करत यू मुम्बाला 20-17 अशी आघाडी मिळवून दिली. यू मुम्बाने तामिळ थलैवाजचे सर्व गडी बाद करत आपली आघाडी 31-22 अशी भक्कम केली. अखेर यू मुम्बाने हा सामना 39-32 अशा गुणांनी जिंकून तमिळ थलैवाजचे आव्हान 7 गुणांच्या फरकाने संपुष्टात आणले.