सईद मुश्ताक अली चषक टी-20 स्पर्धा
वृत्तसंस्था/ लखनौ
येथे सुरू असलेल्या सईद मुश्ताक अली चषक पुरुषांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत विविध गटातील सामन्यात तामिळनाडू, बंगाल आणि चंदिगढ संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदविले.
ई गटातील झालेल्या सामन्यात तामिळनाडूने सिक्कीमचा 9 गडय़ांनी पराभव केला. दुसऱया एका सामन्यात बंगालने ओदिशाचा 8 गडय़ांनी तर चंदिगढने झारखंडचा 9 गडय़ांनी पराभव केला.
ई गटातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सिक्कीम संघाने 20 षटकात 79 धावा जमविल्या. त्यानंतर तामिळनाडूने 9.4 षटकात 1 बाद 80 धावा जमवित हा सामना 9 गडय़ांनी जिंकला. सिक्कीम संघातर्फे पंकजकुमार रावतने 22, अंकुश मलिकने 17 तर अन्वेष शर्माने 11 धावा जमविल्या. तामिळनाडूतर्फे रविश्रीनिवासन, साईकिशोरने 7 धावात 3 गडी बाद केले. संजय यादव आणि सिद्धार्थ यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. प्रत्युत्तरादाखल खेळताना तामिळनाडूच्या डावात सलामीच्या नारायण जगदीशनने 35 चेंडूत नाबाद 58 धावा जमविल्या.
बंगालविरुद्ध सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ओदिशाचा डाव 18.1 षटकात 86 धावात आटोपला. अभिषेक राऊतने 25 धावा जमविल्या. बंगालतर्फे ऋतिक चॅटर्जीने 2 धावात 3 गडी तर रणज्योत खेराने 2 धावात 4 गडी बाद केले. त्यानंतर बंगालने 14.3 षटकात 2 बाद 87 धावा जमवित हा सामना 8 गडय़ांनी जिंकला. अभिमन्यू ईश्वरनने नाबाद 37 तर अभिषेक पोरलने नाबाद 20 धावा जमविल्या.
तिसऱया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झारखंडने 20 षटकात 9 बाद 106 धावा जमविल्या. आयुष भारद्वाजने 30 धावांचे योगदान दिले. चंदिगढतर्फे गुरिंदर सिंगने 20 धावात 4 तर संदीप शर्माने 16 धावात 3 गडी बाद केले. त्यानंतर चंदिगढने 17.3 षटकात 1 बाद 107 धावा जमवित हा सामना 9 गडय़ांनी जिंकला. मनन वोहराने नाबाद 72 धावांचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक
1) सिक्कीम 20 षटकात सर्वबाद 79, तामिळनाडू 9.4 षटकात 1 बाद 80, 2) ओदिशा 18.1 षटकात सर्वबाद 86, बंगाल 14.3 षटकात 2 बाद 87, 3) झारखंड 20 षटकात 9 बाद 106, चंदीगढ 17.3 षटकात 1 बाद 107.