ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवास्थानी भेट घेतली. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने ही भेट होती. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे सामंत यांनी या भेटीनंतर मीडियाशी बोलताना सांगितले.
सामंत म्हणाले, मागील काही दिवसांत मी तिसऱ्यांदा शरद पवार यांची भेट घेतली आहे. मात्र, मीडियाने याचा राजकीय अर्थ काढू नये. राजकारणापलिकडेही काही गोष्टी असतात. अखिल भारतीय नाटय़ परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. दोन जिल्ह्यातील निकाल अद्याप बाकी आहे. शरद पवार हे या नाटय़ परिषदेचे तहयात विश्वस्त आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली ही संस्था चालते. या निवडणुकीची माहिती देण्यासाठी मी विश्वस्त या नात्याने त्यांना भेटायला गेलो होतो. माझ्यासोबत निवडून आलेले सदस्यही होते. ही राजकीय भेट नव्हती.
अधिक वाचा : मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक; सर्व मंत्र्यांना हजर राहण्याचे आदेश
अजित पवारांबद्दल बोलताना ते म्हणाले, अजित पवार यांची विचारधारा वेगळी आहे. त्यांनी त्यांची विचारधारा बदलली तर मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदी हे त्याबाबत निर्णय घेतील, असे सामंत म्हणाले.