Udgaon Grampanchayat News : तब्बल चार महिन्यानंतर उदगाव ग्रामपंचायत मधील सदस्यांची बैठक सोमवारी झाली. सुरुवातीस अगदी शांततेच चर्चा होत होती मात्र, अचानक सदस्यांशी चर्चा न करता परस्पर सरपंच यांनी एनओसी दिल्याने ही बैठक वादग्रस्त ठरली रात्री नऊपर्यंत ही बैठक चालली. उदगावच्या ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये एवढ्या वेळेपर्यंत तसेच पोलीस बंदोबस्त व तीन पेक्षा जास्त ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत झालेली पहिली सभा ठरली.तब्बल ९ तास सुरू असलेल्या मासिक सभेत सरपंच विरुद्ध उपसरपंच, सदस्य यांच्यामध्ये जोरदार वाद झाला.तर सरपंच कलीमुन नदाफ यांनी मासिक सभा असताना दोन दिवसांपूर्वी बेकायदेशीरपणे उदगाव ग्रामीण रुग्णालयाचा ठराव दिल्याने सदस्यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना धारेवर धरून जाब विचारला.यामुळे प्रचंड तणावाचे वातावरणात निर्माण झाले होता.
कर्मचाऱ्यांचे पगार ६ महिन्यापासून दिले नाहीत.असे असताना उदगाव ग्रामीण रुग्णालयाचा विषय आल्यानंतर सरपंच कलीमुन नदाफ व ग्रामविकास अधिकारी जमीर अडकाठे यांनी हा ठराव २ दिवसांपूर्वी दिल्याचे सांगितले. त्यांनतर स्वाभिमानीच्या सदस्यांनी आम्हाला या ठरावाला विरोध नाही पण मासिक सभा २ दिवसात असताना परस्पर बेकायदेशीरपणे हा ठराव दिल्याचा मुद्दा उचलून सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरून खडे बोल सुनावले.तर महिला सदस्या सुनीता चौगुले व भारती मगदूम यांनी सरपंच यांनी टक्केवारीसाठीच परस्पर ठराव दिल्याचा आरोप केला. तर ग्रामपंचायत सदस्य हिदायत नदाफ, सलीम पेंढारी, रमेश मगदूम यांनी ग्रामविकास अधिकारी यांनी परस्पर बेकायदेशीर ठराव दिल्याने हा ठराव चुकीचा दिला असल्याचे तसेच इथून पुढे हे ग्रामसेवक व सरपंच यांना आम्ही कधीही सहीचा अधिकार देणार नाही असे सांगितले.
अखेर सोमवारी सकाळी १२ वाजता सुरू झालेली सभा रात्री ९ वाजता संपली. हा वादाचा विषय तालुक्यातील ग्रामसेवक संघाला कळल्यानंतर तालुक्यातील सुमारे दहाहून अधिक ग्रामसेवक घटनास्थळी धाव घेऊन, ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना समजवून सांगत होते.शेवटी यावर ग्रामसेवकांनी आपण कोणाच्या सांगण्यावरून केले हे लेखी स्वरूपात दिल्यानंतर बाकीचे विषय घेण्यात आले.उर्वरित विषयासाठी आणखीन एक विशेष सभा घेण्याचे ठरले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य,पोलीस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
सभेतील गोंधळाचे ठळक मुद्दे
-सरपंचावर भ्रष्टाचा आरोप करत सतत समोर असलेले बाक हाताने बडवत असताना सदस्य जोस्त्ना गदगडे यांच्या हातातील बांगड्या फुटुन त्या हातात गेल्याने रक्त येऊ लागले. तरीही त्या आपल्या संताप व्यक्त करत होत्या. शेवटी दवाखान्यातून उपचार घेऊन परत त्या सभेत हजर राहिल्या.
-एक महिला सदस्यांच्या पतीने मध्येच बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इतर महिला सदस्यांनी तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, अस म्हणत महिला सदस्यामध्ये वाद झाला.
-आपले सहकारी अडचणीत असल्याचे पाहून यावेळी ग्रामसेवक संघटनेचे अनेक पदाधिकारी या सभेत धावून आले. मात्र, त्यांनाही तुम्हाला आमच्या बोलण्याचा अधिकार नसल्याच सदस्य यांनी सांगितले.
-उदगाव ग्रामपंचायतमध्ये वरिष्ठ लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी यांचा हस्तक्षेप जास्त होत असल्याने गावचा विकास करण्याचा कोणाचा हेतू नसल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू होती.