रशियन सैनिकांनी मुलाची बोटं कापली, हात-पाय तोडले, तोंडात पिस्तुल ठेवून घेतला जीव
बालपणीचे दोन मित्र युक्रेनची राजधानी कीव्हनजीक एका गावात लहानाचे मोठे झाले आणि सैन्यात भरती झाले. पीस स्ट्रीटवर या दोघांचे घर हेते. परंतु रशियासोबतच्या युद्धात त्या दोघांचा क्रूरपणे जीव घेण्यात आला. पावेल खोलादेंको आणि व्हिक्टर बलाई यांचे मृतदेह एप्रिलच्या प्रारंभी वनक्षेत्रात आढळून आले होते. दोघांचे वय केवळ 28 वर्षे होते.
एकत्र शिकले, एकत्र देशसेवा
दोघांनी शालेय शिक्षण एकत्रच पूर्ण केले आणि मग एकत्र युक्रेनच्या सैन्यात सेवा बजावली. मुलांचे मृतदेह पाहिल्यावर त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले, रशियाच्या सैनिकांनी अत्यंत क्रूरपणे या दोघांचा जीव घेतला होता. दोघांचाही प्रचंड छळ करण्यात आला होता. त्यांच्या शरीरातील प्रत्येक हिस्स्यावर याच्या खुणा दिसून येत होत्या. बोटं, हात, पाय सर्वच ठिकाणी यातना देण्यात आल्या होत्या. पावेलच्या तोंडात रायफल ठेवून गोळी झाडण्यात आली होती असे 48 वर्षीय तेतियाना खोलेदेंको यांनी म्हटले आहे.
क्हिक्टर स्वतःची 49 वर्षीय आई ओलेना बलाई आणि 78 वर्षीय आजी ओल्गा डोवोशेप यांच्यासोबत राहत होता. व्हिक्टरच्या मृत्यूची माहिती कळताच त्या खचून गेल्या आहेत. आम्ही त्याचा 29 वा जन्मदिन साजरा करण्याचे नियोजन करत होतो. परंतु आम्ही इतक्या मोठय़ा दुःखाला सामोरे जावू याची कल्पनाच नव्हती असे ओलेना यांनी म्हटले आहे.
दोन्ही सैनिकांच्या आई आता युक्रेनियन इन्व्हेस्टिगेटरसमोर न्यायाची मागणी करत असून रशियाच्या सैनिकांच्या विरोधात सूड उगविण्याचा विचार त्यांनी चालविला आहे. आमच्या मुलांसोबत ज्याप्रकारे ते क्रूर वागले, त्याचप्रमाणे आम्ही रशियाच्या सैनिकांसोबत वागू इच्छितो असे त्यांनी म्हटले आहे.