हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त स्पर्धेचे आयोजन : कुस्त्यांना शौकिनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वार्ताहर /कुर्ली
येथील कुर्ली-आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त शिंत्रे आखाड्यात गुरुवारी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान पार पडले. यात पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत कोल्हापुरच्या शाहू आखाड्यातील पै. उमेश चव्हाण याने इस्लामपुरच्या जाधव आखाड्याचा पै. अजय निकमचा एकचाक डावावर पराभव करत मैदान मारले. त्याला रोख रक्कम व चांदीची गदा श्रीकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आली. प्रारंभी संजय शिंत्रे व मान्यवरांच्या हस्ते मैदान पूजन करण्यात आले. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत शाहू आखाडा कोल्हापूर येथील पै. किरण जाधव याला दुखापत झाल्यामुळे मुरगूड येथील साई आखाड्याचा पै. रोहन रंडे याला विजयी घोषित करण्यात आले. त्याला विजय माळी यांच्या हस्ते रोख रक्कम व चांदीची गदा देण्यात आली.
तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत कोल्हापुरातील मोतीबाग तालमीचा पै. किरण पाटील याने शाहुपुरी तालमीचा पै. अजय तांबे याला घिस्सा डावावर चितपट केले. त्याला कृष्णात कमते यांच्या हस्ते रोख रक्कम व ढाल देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध लहान-मोठ्या कुस्त्या पार पडल्या. यामध्ये राम पोवार-शाहू आखाडा, विवेक चौगुले-नंदगाव, ओंकार शिंदे-द्रोणागिरी राशिवडे, ओंकार पाटील-द्रोणागिरी राशिवडे, प्रवीण पाटील-मुरगूड, सुशांत कुंभार-राशिवडे, धनराज पाटील-कुर्ली यांनी विजय मिळविला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.
याप्रसंगी पृथ्वीराज पाटील-बोरगाव, रघुनाथ पाटील, वसंत पाटील, अजय पाटील, रामचंद्र निकाडे, राजेंद्र चौगुले, अॅड. अमर शिंत्रे, कृष्णात चव्हाण, राहुल प्रताप, ग्रा. पं. उपाध्यक्ष अमोल माळी, आशिष निकाडे, विजय माळी, विश्वनाथ पाटील, के. डी. पाटील, आण्णासो माळी, अशोक माने, दिनकर पाटील, विनायक तेली, विराज पाटील, नगरसेवक रोहित पाटील, इंद्रजित पोवार यांच्यासह मान्यवर, कुस्ती शौकीन उपस्थित होते. यावेळी पंच म्हणून दत्ता पाटील, बाळू माळी, बाळासो पानारे, वासू दिवटे, शंकर कमते, दत्ता कोकीतकर, नेताजी घराळे, विठ्ठल पाटील, शामराव पाटील, मधुकर पाटील, अशोक माने, रमेश चौगुले, नागेश माळी, लक्ष्मण नेजे, आण्णासो माळी यांनी काम पाहिले. समालोचन कृष्णात चौगुले-राशिवडे यांनी केले.