अध्यक्ष झेलेंस्की यांच्याशी चर्चा ः गहू निर्यात योजना सुरू ठेवण्याचा मुद्दा
वृत्तसंस्था/ कीव्ह
संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव अँटोनियो गुतेरेस हे मंगळवारी रात्री उशिरा युक्रेनमध्ये पोहोचले. गुतेरेस यांनी राजधानी कीव्हमध्ये युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांची भेट घेतली आहे. दोघांदरम्यान काळय़ा समुद्राद्वारे धान्य निर्यात सुरू ठेवण्याच्या मुद्दय़ावर चर्चा झाली आहे.
मागील वर्षी 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले होते. तेव्हापासून दोन्ही देशांमधील युद्ध सुरू आहे. तर 7 महिन्यांपूर्वी रशिया आणि युक्रेनने काळय़ा समुद्रातून धान्याची वाहतूक करणाऱया कुठल्याही जहाजावर हल्ला न करण्यावर सहमती दर्शविली होती. यामुळे जगाला मोठा दिलासा मिळाला होता.
गुतेरेस हे युक्रेनचा शेजारी देश पोलंडमधून कीव्हमध्ये दाखल झाले आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून गुतेरेस यांचा हा तिसरा युक्रेन दौरा आहे. यापूर्वी ते मागील वर्षी एप्रिल आणि ऑगस्टमध्ये युक्रेनमध्ये पोहोचले होते. झेलेंस्की आणि गुतेरेस यांच्या चर्चेत ग्रेन एक्सपोर्ट स्कीमचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला आहे. हा करार संपुष्टात आणण्याचे संकेत युक्रेन तसेच रशियाने दिलेले नाहीत.
मागे हटण्यास तयार नाही रशिया
चालू वर्षी सुरक्षा परिषदेच्या एका बैठकीत गुतेरेस यांनी रशियाला फटकारले होते. रशियाच्या हल्ल्यामुळे मोठय़ा प्रमाणात मृत्यू झाले असून प्रचंड हानी झाली आहे. रशियाचे आक्रमण हे संयुक्त राष्ट्रसंघ चार्टरच्या विरोधात आहे. रशियामुळे युक्रेनचे नागरिक हलाखीचे जीवन जगत असल्याचे गुतेरेस यांनी सुनावले होते. गुतेरेस यांनी युक्रेन आणि रशिया यांच्यात मध्यस्थीसाठी कमीतकमी तीनवेळा प्रयत्न केले आहेत. परंतु रशिया अन् युक्रेन यांच्यात सहमती होऊ न शकल्याने या प्रयत्नांना यश लाभलेले नाही.