वनवासमाचीत निर्जनस्थळी आढळला मृतदेह, संशयितांचा शोध सुरू
प्रतिनिधी/ उंब्रज
वनवासमाची (ता. कराड) येथे जळण आणायला जंगलात गेलेल्या विवाहितेचा दगडाने ठेचून आणि गळा आवळून खून झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री अकरा वाजता उघडकीस आली. अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करत संशयित पसार झाला. लता मधुकर चव्हाण (वय 45) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. खुनाचे कारण अद्याप समजले नसले तरी पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपासाला सुरूवात केली आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी रात्री व बुधवारी रात्री उशिरापर्यंत तळबीड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून कसून चौकशी सुरू होती. काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र अद्याप या घटने मागचे कारण अस्पष्ट असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्याकडून सांगण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सौ. लता चव्हाण या मंगळवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास जळण आणण्यासाठी घरातून निघून गेल्या होत्या. त्यांची दोन्ही मुले कामानिमित्त बाहेर गेली होती तसेच पती मधुकर चव्हाण हे सेंट्रीगचे काम करत असून तेही कामानिमित्त बाहेर होते.
मुले आल्यानंतर शोधाशोध सुरू
सायंकाळी मुले व पती घरी आल्यानंतर त्यांनी गावात शोधाशोध सुरू केली, मात्र लता या कुठेही मिळून आल्या नाहीत. त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी प्रशांत चव्हाण यांच्या घरी पती व मुले गेले असता लता या डोंगराकडे जळण आणण्यासाठी गेल्याचे काही लोकांनी पाहिले होते. त्यानुसार नातेवाईकांनी डोंगराकडे धाव घेऊन बॅटरीच्या साहाय्याने पाहणी केली असता झाडीत सदर महिला मृत अवस्थेत पडल्याचे रात्री 10 च्या सुमारास दिसून आले. त्यानंतर याबाबतची खबर मृत महिलेचा पुतण्या प्रशांत चव्हाण यांनी तळबीड पोलिस ठाण्यात दिली.
जंगलात मृतदेह आढळल्याने खळबळ
वनवासमाची गावापासून पश्चिमेला सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कपारीत ही घनदाट झाडी असून येथे वाहन जात नाही. पायपीट करुन रात्रीच्या वेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेहाचा पंचनामा करून घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड येथे पाठवण्यात आला. अहवालामध्ये महिलेचा संशयिताने गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून गेल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, तळबीडचे सपोनि राहुल वरोटे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, ठसे तज्ञ, श्वान पथकाने कसून तपास केला. दरम्यान दिवसभरात पोलिसांनी या खुनाच्या तपासाच्या अनुषंगाने चौकशी केली परंतु खुनामागचे नेमके कारण अस्पष्ट असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सौ. लता चव्हाण यांच्या निर्जनस्थळी झालेल्या खुनाच्या घटनेने गावकऱयांसह पोलीस यंत्रणा हादरुन गेली असून सर्व बाजूंनी यंत्रणांचा वापर करुन तपास सुरू आहे. अद्याप कारण अस्पष्ट असले तरी काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
आधी गळा आवळला व नंतर दगडाचे घाव घातले
वनवासमाची येथे मृत लता चव्हाण यांचा मारेकऱयाने अज्ञात कारणावरुन गळा आवळून खून केला. त्या जिवंत राहू नयेत, यासाठी पाठीमागून डोक्यावर दगडाचे घाव घातले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
निर्जनस्थळी मृतदेह आढळला
सौ. लता चव्हाण वनवासमाची गावच्या पश्चिमेस असणाऱया डोंगरातील झाडीत महिलेचा मृतदेह आढळून आला. दरम्यान शवविच्छेदनात गळा आवळून व डोक्यात गंभीर घाव घालून मारल्याचा अहवाल डॉक्टरांकडून प्राप्त झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे व कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घटनास्थळी लता चव्हाण यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तसेच डोक्यावर व चेहऱयावर रक्तस्राव झाला होता.