प्रश्नोत्तर तासाचे कामकाज विरोधकांनी रोखले : हाती फलक घेऊन गेले हौदाकडे,सभापतींना कामकाज करावे लागले तहकूब
पणजी : येथील कला अकादमीच्या 17 जुलै रोजी कोसळलेल्या छताचे तीव्र पडसाद काल मंगळवारी सुरु झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदारपणे उमटले आणि विरोधी पक्षीय आमदारांनी गदारोळ केला. त्या विषयावर प्रथम चर्चा करा, प्रश्नोत्तर तास रद्द करा अशी मागणी त्यांनी लावून धरली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रश्नोत्तर तासानंतर शून्य तासाला निवेदन करतो, असे वारंवार सांगितले. सभापती रमेश तवडकर यांनीही विरोधकांना शांत बसण्याचे आवाहन केले. विरोधकांनी त्यास दाद न देता गदारोळ सुरुच ठेवल्याने सभापतींनी कामकाज तहकूब केले. मुख्यमंत्र्यांनंतर सभापतींनी विरोधकांना शांत बसण्याचे आवाहन केले. मात्र विरोधकांनी ऐकले नाही. त्यांनी हातात फलक घेऊन सभापतींच्या आसनासमोर येऊन आवाज सुरु केला. या प्रकारामुळे सभागृहात मोठा गदारोळ माजला. सभापतींना कामकाज चालवणे अशक्य झाल्यामुळे त्यांनी अर्धा तास कामकाज तहकूब केले. त्यांनी विरोधकांचा स्थगन प्रस्ताव फेटाळल्याचेही सांगितले. त्यामुळे गदारोळ संपुष्टात आला.
सकाळी 11.30 वाजता राष्ट्रगीताने विधानसभा अधिवेशनाची सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते युरी आलेमांव आणि आमदार विजय सरदेसाई यांनी कला अकादमीचा विषय उपस्थित केला आणि हा विषय प्रथम चर्चेला घेण्याची विनंती केली ती सभापतींनी फेटाळली. प्रथम प्रश्नोत्तर तास होऊ द्या मग चर्चा करुया, असे सांगून त्यांनी आसनापुढे आलेल्या विरोधी आमदारांना आसनस्थ होण्यास बजावले, परंतु त्यांनी ऐकले नाही. विरोधी पक्षांतर्फे स्थगन प्रस्ताव देण्यात आला होता त्याचे काय झाले? त्यावर निकाल देण्याची मागणी आलेमांव यांनी केली. तेव्हा तो प्रस्ताव फेटाळला असून सर्वांनी आपापल्या जागेवर जाऊन बसावे, असे वारंवार सभापतींनी सांगितले. परंतु विरोधकांनी ऐकले नाही, उलट हातातले फलक दाखवत त्यांनी आपली नारेबाजी चालूच ठेवली. सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले.
प्रश्नोत्तर तास गेला वाया
विरोधकांच्या मागणीला सरकारने दाद दिली नाही आणि प्रश्नोत्तर तास रद्द करण्याची मागणी मान्य केली नाही. काँग्रेस, आप, आरजी व गोवा फॉरवर्ड या विरोधी पक्षीय उमेदवारांनी कला अकादमीचे छत कोसळण्याचा विषय लावून धरला. प्रश्नोत्तर तासाच्या पहिल्या 15 मिनिटात त्यामुळे एकही प्रश्न चर्चेला घेता आला नाही. त्यानंतर अर्धा तास कामकाज तहकूब केल्यामुळे एकंदरीत 45 मिनिटे प्रश्नोत्तर तासाची वाया गेली.
विजय सरदेसाई पडले एकटे
दुपारी 12.15 वाजता सभापतींनी पुन्हा एकदा कामकाजास प्रारंभ केला. तेव्हा आमदार विजय सरदेसाई हे पुन्हा हातात फलक घेऊन त्याच विषयावर आवाज उठवण्यासाठी पुढे सरसावले आणि चर्चा करण्याची मागणी करु लागले. ते फलक घेऊन सभापतींच्या आसनासमोर येऊन पुन्हा आपले म्हणणे मांडू लागले. सभापतींनी प्रश्नोत्तराचे कामकाज पुढे चालवले. आमदार विरेश बोरकर यांनी आपला प्रश्न विचारला आणि मंत्री सुदिन ढवळीकर यांनी त्यास उत्तरही दिले. प्रश्नोत्तर तास संपेपर्यंत सरदेसाई फलक घेऊन सभापतींसमोर एकटेच उभे होते. तो तास सपंल्याचे जाहीर होताच सरदेसाईंनी आसन ग्रहण केले.
विरोधकांमध्ये फूट?
एकसंघ आणि एकत्र असल्याचा दावा करणाऱ्या विरोधी आमदारांमध्ये फूट पडल्याचे समोर आले असून विधानसभा अधिवेशनात ते स्पष्टपणे दिसून आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील विरोधकांमध्ये फूट पडल्याचे निदर्शनास आणले. कामकाज तहकूब केल्यानंतर पुन्हा जेव्हा ते सुऊ झाले तेव्हा कला अकादमीप्रश्नी विजय सरदेसाई सभापतींसमोर गेले, परंतु इतर विरोधकांनी त्यांना साथ दिली नाही. ते एकटेच सभापतींसमोर बोलत राहिले. इतर विरोधी आमदारांना त्यांना साथ द्यावी, असे वाटले नाही. त्यामुळे सरदेसाई सभापतींसमोर एकाकी पडले.
कुणाही दोषांना सोडणार नाही : मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची ग्वाही
कला अकादमीचे छत कोसळण्यास जे कोणी दोषी असतील त्यापैकी कोणालाही सोडणार नाही, सर्वांवर कारवाई करणारच असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी विधानसभेत दिले. या प्रकरणी स्वतंत्र चौकशीचे आदेश देण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम खाते व कंत्राटदारास चौकशी करण्यास बजावले आहे. शिवाय आयआयटी (ऊरकी) यांना स्वतंत्र चौकशी करण्यास सांगितले असून तिन्ही चौकशी अहवाल येत्या 18 दिवसात म्हणजे अधिवेशन संपण्यापूर्वी विधानसभेत सादर करतो, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शून्य तासाला निवेदन करताना ते म्हणाले की तिन्ही अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा करणे योग्य होईल. कला अकादमी छत कोसळण्याचा प्रकार गंभीर असून तो सर्वांच्या आस्थेचा विषय आहे. खुल्या रंगमंचाचे बांधकाम 43 वर्षे जुने असून ते मधून कोसळले आहे. मधोमध त्या बांधकामास कुठेही टेकू नव्हता. त्यास जो काही आधार होता तो गंजल्याने छत कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. नुतनीकरणाचे काम वेगळे असून कोसळलेल्या रंगमंचाच्या छताचा त्या कामात समावेश नव्हता. शिवाय सार्वजनिक बांधकाममंत्री हे या प्रकरणी श्वेतपत्रिका जारी करणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी कला अकादमीच्या एकंदरीत बांधकामात घोटाळा – भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कऊन त्यास जबाबदार कोण? ते सांगा अशी मागणी केली तर आमदार विजय सरदेसाई यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल कऊन मंत्री महोदयांना हटवा असे बजावले. तसेच आता तरी अर्धा तास चर्चा कऊया, असे त्या दोघांनी सुचवले. परंतु त्यास सभापती रमेश तवडकर व डॉ. सावंत यांनी आक्षेप घेऊन सर्व अहवाल हाती आल्यानंतरच चर्चा करण्याची तयारी दर्शवली.