मेगास्टार चिरंजीवी अन् रवि तेजा मुख्य भूमिकेत
उर्वशी रौतेला सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. विशेषकरून स्वतःच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चाहत्यांचे लक्ष ती अधिकच वेधून घेत आहे. अभिनेत्रीला आता दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. दक्षिणेतील दिग्दर्शक बॉबी कोल्ली यांचा आगामी चित्रपट ‘वॉल्टर वीरैया’मध्ये ती काम करणार आहे.
या चित्रपटात मेगास्टार चिरंजीवी आणि रवि तेजा हे मुख्य भूमिकेत आहेत. तर उर्वशीची निवड एका विशेष गाण्यासाठी करण्यात आली आहे. गाण्याला ग्लॅमरस डीवा आणि चिरंजीवी यांच्यावर चित्रित करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या विशेष गाण्यासाठी मोठा सेट उभारण्यात येणार आहे. आघाडीचे नृत्यदिग्दर्शक शेखर मास्टर यांनी याला कोरियोग्राफ केले आहे.
वॉल्टर वीरैया चित्रपटात श्रूती हासन ही मुख्य नायिका म्हणून काम करत आहे. उर्वशी यापूर्वी द लिजेंड या तमिळ चित्रपटात दिसून आली होती. सायन्स फिक्शन चित्रपटाला फारसे यश मिळाले नव्हते. अशा स्थितीत उर्वशीचा हा चित्रपट यशस्वी ठरतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वॉल्टर वीरैयाची कहाणी अन् संवाद दिग्दर्शक बॉबी यांनीच लिहिले आहेत. 60-70 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार केला जात आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 14 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.