वॉशिंग्टन डीसी / वृत्तसंस्था
भारतीयांसाठी अमेरिकेत जाऊन काम करण्याची संधी उपलब्ध करुन देणारा एच-1बी व्हिसा आता मोठय़ा प्रमाणात महागला आहे. याशिवाय ईबी-5 अर्जांच्या शुल्कातही मोठी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 204 टक्के इतकी आहे. मात्र, ही शुल्कवाढ करताना एक दिलासाही देण्यात आला आहे. ही वाढ त्वरित लागू केली जाणार नाही, असे अमेरिकेच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कंपनीच्या माध्यमातून अमेरिकेत जाऊन काम करणासाठीच्या अर्जाच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. ही शुल्कवाढ अमेरिकेच्या नागरिकत्व आणि स्थलांतर सेवा विभागाने मंगळवारी रात्री उशिरा घोषित केली. मात्र ती आणखी काही महिन्यांनंतर लागू केली जाणार आहे. विभागाने या शुल्क वाढीवर नियमानुसार लोकांच्या प्रतिक्रिया मागविल्या आहेत. त्यासाठी 60 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. लोकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांची छाननी केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ही शुल्कवाढ लागू केली जाईल. कोरोनाच्या उद्रेकामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये अमेरिकेच्या या विभागाला पुरेशा प्रमाणात निधी जमा करता आलेला नाही. त्यामुळे शुल्कवाढ होत आहे.