वृत्तसंस्था/ मनीला
अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाने दक्षिण चीन समुद्रात संयुक्त सागरी सैन्याभ्यास करण्याची घोषणा केली आहे. दक्षिण चीन सागरी क्षेत्रावर चीन स्वत:चा दावा करत असून येथे अन्य देशांच्या जहाजांना येण्यापासून रोखत आहे. 5 ऑगस्ट रोजी चीनने या भागातून जाणाऱ्या फिलिपाईन्सच्या जहाजावर वॉटर कॅननद्वारे हल्ला केला होता.
अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या सागरी सैन्याभ्यासाच माहिती फिलिपाईन्सच्या सुरक्षा अधिकाऱ्याने दिली आहे. या सैन्याभ्यासात 3 युद्धनौका आणि हेलिकॉप्टर्स सामील होणार आहेत. तिन्ही देशांचे कमांडर लवकरच मनिला येथे युद्धाभ्यासाचे स्वरुप ठरविण्यासाठी बैठक घेणार आहेत. दक्षिण चीन समुद्राच्या कुठल्याही हिस्स्यावर अमेरिका दावा करत नाही, तरीही अमेरिकेकडून या भागात सैन्याभ्यास आयोजित केले जात आहेत. या युद्धाभ्यासांद्वारे जपान तसेच फिलिपाईन्स या देशांना मदत करत असल्याचे अमेरिकेचे सांगणे आहे. संयुक्त सागरी सैन्याभ्यासात अमेरिकेच्या वतीने विमानवाहू युद्धनौका युएसएस अमेरिका भाग घेणार आहे. जपान स्वत:च्या सर्वात मोठ्या युद्धनौकांपैकी एक जेएस इजुमा तैनात करणार आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून एचएमएएस कॅनबेरा सागरी युद्धाभ्यासात सामील होणार आहे.