मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती : व्हिस्टिऑन टेकच्या गोवा सेंटरचे उद्घाटन
प्रतिनिधी /पणजी
आयटी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राज्य सरकारने विविध धोरणे आखली असून ही धोरणे पुढील पाच वर्षांसाठी आहेत. त्याद्वारे राज्य सरकार आयटी क्षेत्रात विविध उद्योगांचे स्वागत करत असल्याचा संदेश संपूर्ण देशात आणि आयटी क्षेत्रात जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
व्हिस्टिऑन टेक गोवा सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी पणजीत आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांची त्यावेळी उपस्थिती होती.
वेगवेगळय़ा क्षेत्रात राज्याला नॉलेज पार्टनर बनविणे तसेच संशोधन क्षेत्रात पुढाकार घेण्यासाठी सरकार राज्याला नॉलेज, आयटी आणि तंत्रज्ञान हब बनवण्याचा विचार करत आहे. त्यासाठी आम्ही खाजगी उद्योग तसेच तंत्रज्ञान कर्मचाऱयांना आकर्षित करत आहोत, असे डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.
गोव्यात केंद्र स्थापन केल्याबद्दल व्हिस्टिऑनचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी व्हिस्टिऑनसारखे भागीदार आयटी क्षेत्रात गोवा स्वयंपूर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतील, असा विश्वास व्यक्त केला.
पंतप्रधानांच्या ’आत्मनिर्भर भारत’ उपक्रमानंतर आम्ही ’स्वयंपूर्ण गोवा’ कार्यक्रमाद्वारे गोव्याला प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनविण्याची योजना सुरू केली आहे. आयटी क्षेत्रासाठी आमची दृष्टी गोव्याला आयटी हब बनवणे आहे, पुढे बोलताना डॉ. सावंत म्हणाले.
मेळाव्याला संबोधित करताना श्री. खंवटे यांनी राज्यातील आयटी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी सरकारच्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. व्हिस्टिऑन टेक गोवा सेंटरचे अध्यक्ष आणि सीईओ सचिन लवांडे, रॉबर्ट व्हॅलेन्स व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.