Ambabai temple kolhapur : अंबाबाई मंदिरात पूजा करत असताना अचानक झाडाने पेट घेतल्याने वडाची पुजा करणाऱ्या महिलांना पळता भुई थोडी झाली. मंदिर प्रशासनाने वेळीच आग विझवल्याने अनर्थ टळला. कापूर आणि उदबत्तीची आग वटपौर्णिमेच्या पूजेनिमित्त बांधलेल्या दोऱ्याला लागल्याने हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
दरवर्षी मोठ्या संख्येने अंबाबाई मंदिरातील वडाच्या झाडाची पूजा पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी महिला करतात. यंदाही सकाळपासूनच मोठ्या संख्येने महिला अंबाबाई मंदिरात पूजा करण्यासाठी एकत्र जमल्या. दुपारच्या दरम्यान अचानक कापूर आणि उदबत्तीची आग वटपौर्णिमेच्या पूजेनिमित्त बांधलेल्या दोऱ्याला लागल्याने झाडाला आग लागली. सर्तकता बाळगत मंदिर परिसरातील यंत्रणेने आग आटोक्यात आणली. अग्निरोधक मशीनच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली.