पुणे / प्रतिनिधी :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर यांची निवड करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत डॉ. काळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंची निवड गेली अडीच महिन्यापासून रखडली होती. कुलगुरूंना प्र-कुलगुरूपदाच्या निवडीचे अधिकार असताना देखील होत नव्हती. राज्यपालांनी मुंबई व पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड एकाच वेळी केली. यानंतर मुंबई विद्यापीठाकडून तातडीने प्र-कुलगुरू निवडण्यात आले होते. मात्र, पुणे विद्यापीठाकडून विलंब केला जात होता.
विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार पूर्वी विद्यापीठाचे कुलपती अर्थात राज्यपालांकडून प्र-कुलगुरूंची निवड केली जात होती. परंतु, विद्यापीठ कायद्यात दुरूस्ती केल्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्र-कलगुरूंची निवड करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार शनिवारी डॉ. पराग काळकर यांची प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. काळकर हे पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या शर्यतीत होते. पहिल्या पाच उमेदवारांमध्ये ते आले होते. आता त्यांना प्र-कलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने यापुढील काळात त्यांच्यासमोर अनेक आव्हाने असणार आहेत.
विद्यापीठाचे घसरलेले रँकिंग, उशिरा लागणारे निकाल अशा अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. विद्यापीठातील विविध विभाग व संलग्न महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राबवाव्या लागणाऱ्या उपाय योजनांचे नियोजन त्यांना करावे लागणार आहे.
निवड रद्द करण्याची मागणी
काळकर यांच्या निवडीवरून विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ प्रशासनावर टीका केली असून निवड रद्द करण्याची मागणी केली आहे. काळकर यांनी एका बँकेचे संचालक असताना केलेल्या आर्थिक गैरव्यवहारात गुन्हा दाखल असताना विद्यापीठाने राजकीय दबावापोटी ही निवड करण्यात आल्याचा आरोप स्टूडंट हेल्पिंग हँण्ड्सचे कुलदीप आंबेकर आणि विद्यापीठ विद्यार्थी कृषी समितीचे राहूल ससाणे यांनी केला आहे. वेळप्रसंगी राज्यपाल कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे