प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur News : इचलकरंजी येथील राशी पारख यांनी सीएस परीक्षेत देशात 900 पैकी 553 गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक मिळवला. त्यांच्या या यशामुळे इचलकरंजीचे नाव सीएस क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. सातत्याने रात्रंदिवस अभ्यास, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव, हार्डवर्कमुळे हे यश प्राप्त झाल्याचे राशी पारख यांनी तरूण भारत संवादशी बोलताना सांगितले.
राशी यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इचलकरंजी येथील न्यू मेलेनियम पब्लिक स्कूलमध्ये घेतले आहे. त्यानंतर अकरावी-बारावी श्रध्दा ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पूर्ण केले. तर सध्या व्यंकटेश महाविद्यालयामध्ये बीकॉम तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. बीकॉमचे शिक्षण घेत त्यांनी पुण्यातील एका खासगी क्लासमध्ये सीएस परीक्षेचे मार्गदर्शन घेतले. तसेच ऑनलाईन क्लासही पूर्ण केला. त्याचबरोबर नियमित पुस्तकांचा अभ्यास आणि प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव केला. दिवसातील किमान आठ ते दहा तास सातत्याने अभ्यास केला. स्वत:वर विश्वास ठेवत केलेल्या हार्डवर्कमुळे देशात अव्वल येण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यांच्या या यशामुळे इचलकरंजी शहरासह नातेवाईक, शिक्षक यांच्याकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
परदेशात नोकरीला जाण्याची इच्छा
बीकॉम पूर्ण झाल्यानंतर सीएसची इंटरशिप पूर्ण करून कंपनी सेक्रेटरीपदी रूजू होणार. भविष्यात परदेशी जाण्याच्या यादृष्टीने प्रयत्न करून परदेशात सेटल होणार आहे. सीएस करताना मला माझे वडील अमृत पारख, आई सीमा पारख, काका, काकी, भाऊ आणि बहिण यांनी सहकार्य केले. सीएस परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वत:वर विश्वास ठेवून हार्डवर्क करण्याची तयारी ठेवावी. तसेच ही परीक्षा कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी द्यावी. भविष्यात सीएसमध्ये चांगले करिअर आहे.
राशी पारख (विद्यार्थीनी, इचलकरंजी)