वृत्तसंस्था/ चेन्नई
पाचवेळा विश्व चॅम्पियन किताब मिळविणारा भारताचा अनुभवी ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदची फिडेच्या उपाध्यक्षपदी रविवारी नियुक्ती करण्यात आली. फिडेचे विद्यमान अध्यक्ष ऍरकादी द्वोरकोविच यांची दुसऱयांदा अध्यक्षपदासाठी फेरनिवड झाली आहे.
फिडेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये द्वोरकोविच यांना 157 मते मिळाली. अध्यक्षपदासाठी इच्छूक असलेले त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अँड्री बेरीशोपलेटस् यांना केवळ 16 मते मिळाली. विश्वनाथन आनंद हे अध्यक्ष द्वोरकोविच यांच्या गटात सहभागी सदस्य आहेत. या निवडणुकीत एक मत बाद ठरले असून पाच सदस्यांनी या निवडणुकीत भाग घेतला नाही.
सध्या येथे सुरू असलेल्या फिडेच्या 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेवेळी फिडे काँग्रेसची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. विश्वनाथन आनंदने आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे कमी केले असून आता तो बुद्धिबळ प्रशिक्षण क्षेत्रामध्ये वळला आहे. जागतिक बुद्धिबळ क्षेत्रामध्ये विश्व कनिष्ठ गटातील बुद्धिबळ जेतेपद मिळविणारा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला बुद्धिबळपटू म्हणुन ओळखला जातो. आनंदने आपल्या वैयक्तिक बुद्धिबळ कारकीर्दीत पाचवेळा विश्व बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकली असून त्याने 2017 साली शेवटचे विश्व रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेतील विजेतेपद मिळविले होते. फिडेच्या इतिहासामध्ये विश्वनाथन आनंदचे योगदान भविष्यकाळात महत्त्वाचे ठरेल, अशी आशा अध्यक्ष द्वोरकोविच यांनी व्यक्त केली आहे.