वृत्तसंस्था/ अमृतसर (पंजाब)
येथे सुरु असलेल्या 2022-23 च्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय महिलांच्या फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत ब गटातील झालेल्या शेवटच्या सामन्यात विद्यमान विजेत्या मणिपूरने बंगालचा 3-2 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. तर या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात हरियाणाने महाराष्ट्रचे आव्हान 4-0 असे एकतर्फी संपुष्टात आणले.
मणिपूर आणि बंगाल यांच्यातील सामन्यात 17 व्या मिनिटाला कर्णधार बालादेवीने मणिपूरचे खाते उघडले. 40 व्या मिनिटाला सेरटो लिंडा कॉमने मणिपूरचा दुसरा गोल केला. मध्यंतराला केवळ 2 मिनिटे बाकी असताना मौसमी मुर्मूने बंगालचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत मणिपूरने बंगालवर 2-1 अशी आघाडी घेतली होती.
59 व्या मिनिटाला लिंडा कॉमने मणिपूरचा तिसरा तर वैयक्तिक दुसरा गोल केला. बंगालची कर्णधार संगीता बेसफोरने आपल्या संघाचा दुसरा गोल नोंदवून मणिपूरची आघाडी थोडी कमी केली. पण त्यांना शेवटपर्यंत बरोबरी साधता आली नाही. या सामन्यात मणिपूरच्या लिंडा कॉमला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात भारतीय रेल्वे संघाने हिमाचल प्रदेशचा 7-1 अशा गोलफरकाने पराभव केला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. दरम्यान खेळाच्या उत्तरार्धात रेल्वेने 6 गोल नोंदविले. हा सामना एकतर्फी झाला. या सामन्यात रेल्वे संघाची युमनाम कमलादेवीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रेल्वे संघाला पराभव पत्करावा लागला होता. दुसऱ्या एका सामन्यात हरियाणाने महाराष्ट्राचा 4-0 असा फडशा पाडला. हरियाणाचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. हरियाणाच्या रेणू राणीने 2 गोल नोंदविले. कर्णधार रितू राणीने तसेच संतोषने प्रत्येकी 1 गोल केला.