एकूण 2000 तासांपर्यंत काढून घेतले टॅटू
बॉडी मॉडिफिकेशनचा ध्यास लोकांना अनेकदा खूपच विचित्र कृत्य करण्यास भाग पाडतो. एक अशाच जोडप्याने अनेक वर्षांपर्यंत शरीरावर अनेक टॅटू काढून घेतल्याने आता ते जगातील सर्वाधिक टॅटू असलेले जोडपे ठरले आहे. या जोडप्याने वृद्धापकाळात स्वतःचा छंद पूर्ण करत विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे.
अमेरिकेच्या एका वृद्ध जोडप्याने पूर्ण शरीर टॅटूंनी भरून टाकण्यासाठी 2 हजरा तासापर्यंत खुर्चीवर बसून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. स्वतःला चालती-फिरती आर्ट गॅलरी म्हणवून घेणाऱया या जोडप्याने 90 टक्क्यांपेक्षा अधिक शरीराला टॅटूंनी झाकोळून टाकले आहे. या जोडप्यातील हेल्मके यांचे वय 81 वर्षे तर शार्लोट गुटेनबर्ग यांचे वय 74 वर्षे आहे.
शार्लोट या वयाच्या 74 व्या वर्षी 98 टक्के शरीराला टॅटूंनी झाकोळून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणाऱया सर्वात वृद्ध महिला ठरल्या आहेत. त्यांचे पती चार्ल्स हेल्मके यांनीही 97 टक्के शरीराला टॅटूंनी वेढून घेतले आहे. या दोघांनी मोस्ट टॅटूड ओल्ड कपल म्हणून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव नोंदविले आहे. शार्लोट या सर्वाधिक हेड टॅटूच्या विक्रमधारक देखील आहेत.
फ्लोरिडा येथे मेलबर्नच्या शार्लोट गुटेनबर्ग आणि त्यांचे पती चार्ल्स हेल्मके यांनी स्वतःचा टॅटूचा छंद पूर्ण करण्यासाठी जवळपास 2 हजार तास खुर्चीवर बसून काढले आहेत. तसेच शरीरावर वेगवेगळय़ा डिझाइन्स तयार करवून घेतल्या आहेत. शार्लोट यांनी वयाच्या 57 व्या वर्षी पहिला टॅटू काढून घेतला होता. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांच्या शरीराचा 98 टक्के टॅटूंनी भरून घेतला आहे. परंतु अद्याप त्या पूर्ण संतुष्ट झालेल्या नाहीत. चार्ल्स हे पूर्वी अमेरिकेच्या सैन्यात तैनात होते. या दोघांची भेट देखील एका टॅटू पार्लरमध्येच झाली होती.